विधानसभा निवडणुका: निवडणूक आयोग आज काय सांगणार?

1012

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व निवडणूक आयोगाचे पथक मंगळवारी मुंबईत दाखल झाले असल्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांमधील धडधड वाढली आहे. मुंबई भेटीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार का, आचारसंहिता लागू करणार अथवा फक्त निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार याकडे राजकीय पक्ष आणि मीडिया तसेच राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर 18 सप्टेंबरला नक्की कोणती घोषणा होणार याबाबत संपूर्ण राज्यात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा व आयोगाचे उपनिवडणूक आयुक्तांचा ताफा आज रात्री मुंबईत येऊन थडकला आहे. दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यात निवडणूक आयुक्त व त्यांची टीम राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

बैठकांचा धडाका

18 सप्टेंबरला सकाळपासून निवडणूक आयुक्तांचा बैठकांचा धडाका आहे. सकाळी 9.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक होईल. त्यानंतर सुमारे 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षकांसोबत बैठका होतील. त्यानंतर निवडणूक खर्च देखरेखविषयक विभागांसोबत बैठक आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गृह विभागाचे सचिव व इतर उच्चपदस्थ अधिकार्‍यांसोबत बैठक होईल.

काय घोषणा करणार

मुख्य निवडणूक आयुक्त सायंकाळच्या पत्रकार परिषदेत नेमकी काय घोषणा करणार याबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त पत्रकार परिषदेत नेमकी कोणती माहिती देणार याबाबत राजकीय पक्षांकडून सतत विचारणा होत आहे. दिवसभराच्या आढावा बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक आयुक्तांचे पथक रात्रीच नवी दिल्लीला रवाना होईल.

आपली प्रतिक्रिया द्या