
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना ‘मताधिकार’ अॅप उपलब्ध करून दिला आहे. ‘मताधिकार’ मोबाईल अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा (एपिक) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. अॅपच्या माध्यमातून आपले मतदान पेंद्रही कळू शकते. याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील Search Name in Voter Listवर क्लिक करून मोबाईल अॅपप्रमाणेच ‘नाव’ किंवा एपिक क्रमांक नमूद करून नाव शोधता येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे.





























































