निवडणूक आयोगाची ‘शाईफेक’! मतदारांवरच फोडले खापर, दिला कारवाईचा इशारा

फोटो - रुपेश जाधव

मुंबईत मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सर्वच स्तरांतून टीका होत असताना आता राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. शाई प्रकरणावर उलट्या बोंबा मारत आयोगाने मतदारांवरच त्याचे खापर फोडले आहे. शिवाय शाई पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा चुकीचे व्हिडीओ पसरवून संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

वाघमारे यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोग 2011 पासून ‘कोरस’ कंपनीचे मार्कर पेन वापरत आहे. ज्यात सिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. ही शाई सुकण्यासाठी साधारण 10 ते 12 सेकंदांचा कालावधी लागतो आणि तोपर्यंत मतदार मतदान केंद्रातच असतो. एकदा शाई सुकल्यानंतर ती कोणत्याही परिस्थितीत निघू शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. आयोगाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या शाईची तपासणी करण्यात आली असून ती शाई पुसली गेलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. नेलपेंट रिमूव्हरने शाई निघत असल्याच्या आरोपांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, शाई अशा प्रकारे निघणे शक्य नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये कोणते रसायन वापरले आहे, याची चौकशी केली जाईल.

मतदारांनी स्वतःहून शाई पुसणे ही त्यांची चूक असल्याचे सांगत वाघमारे यांनी मतदारांवरच या प्रकरणाचे खापर फोडले आहे. जर कोणी मुद्दाम शाई पुसून त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करत असेल आणि त्याद्वारे ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर ताबडतोब गुन्हे दाखल केले जातील, असेही आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.