निवडणूक निकालांबाबत काँग्रेसचे आत्मचिंतन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
congress

विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालाविषयी काँग्रेसकडून आज आत्मचिंतन करण्यात आले. आघाडीत काँग्रेसला मिळालेल्या 44 जागा आणि 55 जागा मिळवून राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरला आहे. विरोधी पक्षनेतेपदही राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने काँग्रेसच्या खालावलेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज काँग्रेसची बैठक पार पडली.

काँग्रेसचे विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट हायकमांडवर निशाणा साधत हायकमांडने साथ दिली नाही अशी टीका नुकतीच केली होती. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या पार पडलेल्या बैठकीत कुठे चुकले याबाबत आत्मचिंतन करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे काँग्रेसच्या जागा निवडून आल्याचे चित्र निर्माण झाले असताना काँग्रेस नेते कुठे कमी पडले याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीकडून आंदोलनांना सुरुवात झाली असतानाच आता काँग्रेसकडूनही ठोस भूमिका घेण्याबाबत या बैठकीत सर्वांचेच एकमत झाले. काँग्रेसकडून देशभरात करण्यात येणाऱया सरकारविरोधी आंदोलनाचीही रणनीती या बैठकीत ठरविण्यात आली. या बैठकीला या बैठकीला देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल कासनिक आदी उपस्थित होते.

शेतकऱयांच्या नुकसानभरपाईसाठी राज्यपालांना भेटणार

राज्यात अद्यापही पाऊस सुरू असल्याने शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेले खरीप पीक पूर्णपणे वाया गेले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष बागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील भातशेती उद्ध्वस्त झाली आहे. फळबागांसह पशुधनाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सरकारने तत्काळ पंचनामे करावेत व शेतकऱयांना भरीव आर्थिक मदत द्यावी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे.

गटनेता ठरविण्यासाठी आज बैठक

गुरुवार, 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. टिळक भवन दादर येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.