निवडणूक ड्युटीचा फटका, सहामाही परीक्षेचा निकाल उशिराने?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षकांना लावण्यात आलेल्या डय़ुटीचा फटका सहामाही परीक्षेच्या निकालाला बसला आहे. काही शाळांमध्ये अजूनही निकाल तयार होत आहेत. तर काही शाळांमध्ये पेपर तपासणी तसेच तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा सहामाही परीक्षेचा निकाल चार ते पाच दिवस उशिरा लागण्याची चिन्हे आहेत.

22 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिक्षकांना ऐन सहामाही परीक्षांच्या तोंडावर निवडणूक कामांना जुंपण्यात आले. निवडणूक डय़ुटीत अडकलेल्या शिक्षकांचे शालेय वेळापत्रक कोलमडले. काही शाळांच्या सहामाही परीक्षा दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांतही घेण्यात आल्या. तोंडी परीक्षा पुढे ढकलून काही शाळांनी आधी लेखी परीक्षा घेण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे काही शाळांमध्ये दिवाळी सुट्टीनंतर तोंडी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर निकाल तयार होणार आहे.

मुंबई मुख्याध्यापक संघाचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले, ‘मुंबई विभागात दिवाळी सुट्टीनंतर शाळा लवकर म्हणजे 6 नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. शिक्षकांची निकालाची कामे अद्याप सुरू असून शनिवारपर्यंत निकाल जाहीर होईल.’

निकालपत्र देणे बाकी
कुलाबा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अंबरसिंग मगर यांनी सांगितले की, ‘विद्यार्थी-पालकांना तोंडी निकाल सांगितला आहे. निवडणूक डय़ुटीमध्ये शिक्षक अडकल्याने प्रगती पुस्तक तयार करण्याचे काम बाकी असून लवकरात लवकर छापील निकाल दिला जाईल.