निवडणूक खर्चाच्या घोटाळ्याचे शेपूट लांबतच चालले; मुख्य सचिव, निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार

3112
प्रातिनिधिक फोटो

लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये वाढीव बिले मंजूर करून 9 कोटी रूपयांचा घोटाळा उघडकीस आला असताना मतदारांच्या जागृतीसाठी बॅनर आणि पोस्टरमध्येही अधिकाऱ्यांनी ताव मारला आहे. विधानसभा निवडणुकीत तब्बल 50 हजार स्क्वेअर फूटचा मंडप लावल्याचे दाखऊन ठेकेदारांचे हित जोपासले आहे. घोटाळ्याची ही प्रकरणे समोर येत असताना आता राज्याचे मुख्य सचिव आणि राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आल्याने घोटाळेबाज अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक विभागाने बीड जिल्ह्यामध्ये कोटीच्या कोटी बोगस बिलाचे उड्डाण घेत घोटाळे केल्याचे उघडकीस आले आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे बील तब्बल 9 कोटी रूपये मंजूर करून घेतले आहेत. त्यानंतर घोटाळ्याचे एक एक प्रकरणे समोर येऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकाप्रमाणे निवडणूक खर्चाची अफरातफर झाल्याचे समोर येत आहे. मतदारांच्या जनजागृतीसाठी बॅनर आणि पोस्टर लावले त्याची साईज कमी असताना जास्तीची साईज दाखवून बिलाचा आकडा 55 लाखाच्या घरात नेला. तसेच 50 हजार स्क्वेअर फूट मंडप दिल्याचे दाखवत विधानसभा निवडणुकीतही घोटाळ्याचा प्रयत्न झाला. निवडणूक विभागातील हा घोटाळा थक्क करणारा आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून निवडणूक आयोगाच्या पैशाची लुटमार केली आहे. या घोटाळ्याच्या प्रकरणी अखेर भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे अजित देशमुख यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. लेखी तक्रार झाल्यामुळे निवडणूक खर्चाचे चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातील निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे या तक्रारीमुळे दणाणले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या