
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या दिग्गजांची नावे नाहीत. खडसे यांनी नाव नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल केला असून आपल्यावर अन्याय झाल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्रकारांनी विचारले असता, न्याय किंवा अन्याय कुणीही तिकिटाशी जोडू नका. खडसे यांनी बोलून दाखवलेली खंत बरोबर आहे, परंतु त्याचा तिकीटवाटपाशी संबंध नाही असेही मुनगंटीवार म्हणाले.
एकनाथ खडसे हे कधीही पक्ष सोडून जाणार नाहीत. ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत असे मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडून खंत व्यक्त होऊ शकते, मात्र अमक्याला न्याय मिळाला नाही, तमक्यावर अन्याय झाला याचा संबंध कुणीही तिकिटाशी जोडू नये, असे मुनगंटीवार म्हणाले. पक्षाशी एकनिष्ठ राहणे हा गुन्हा असेल तर तो मी केलाय, असे खडसे म्हणाले. याबाबत विचारले असता त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. तो गुन्हा मीदेखील केलाय. त्यामुळेच पक्ष प्रगतिपथावर असून आम्ही सत्तेत आहोत, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
पवारांनी तिकीट दिल्यानंतरही उमेदवार राष्ट्रवादीत थांबेनात, मुंदडांचा भाजप प्रवेश

























































