
तीनशे युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांचे लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, त्याची आर्थिक भरपाई राज्य सरकारने करावी या मागणीसाठी 27 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील महावितरणच्या जिल्हा कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने दिला आहे.
कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही, मात्र घरगुती वीज वापर सुरूच असून त्याची वीज बिले महावितरणकडून प्रत्येक महिन्याला पाठवली जात आहेत. त्यामुळे ती भरायची कशी असा प्रश्न सर्वसमन्यांपुढे उभा राहत आहे. त्या पार्श्वभूमीवर महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज कापर असलेल्या घरगुती ग्राहकांना लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची बिले माफ करावीत या मागणीसाठी टाळे ठोको आंदोलन करण्याची निर्णय कोल्हापूर येथे झालेल्या वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगडे यांनी दिली.
गुजरात, मध्य प्रदेशमध्ये 50 टक्के बिल माफ
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश आणि केरळ सरकारने वीज ग्राहकांना बिलात 50 टक्क्यांची सूट दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही वीज बिलात सवलत मिळेल अशी ग्राहकांना अपेक्षा होती. तसेच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही ग्राहकांना 20-25 टक्के सवलत देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्याबाबतही ठोस निर्णय न झाल्याने ग्राहकांमध्ये मोठी नाराजी असल्याचेही होगडे यांनी स्पष्ट केले.





























































