
अनलॉक-5 मुळे मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाली असून उद्योगधंद्यानाही गती आली आहे. त्यामुळे राज्यातील विजेची मागणी अनलॉक झाली आहे. लॉकडाऊनच्याआधी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जेवढी विजेची मागणी नोंदली जात होती, तेवढी मागणी सध्या नोंदली जात आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत मुंबईची विजेची मागणी 2500 मेगावॅट नोंदली जात आहे, तर महावितरणकडे राज्यभरातून 17 हजार मेगावॅट एवढी मागणी नोंदली आहे.
लॉकडाऊनच्याआधी कृषी पंपाचा वीज वापर मोठय़ा प्रमाणात सुरू असतानाही महावितरणकडे दररोज 19-20 हजार मेगावॅट एवढी तर मुंबईत अडीच हजार मेगावॅट एवढी मागणी नोंदली जात होती. मात्र कोरोना महामारीमुळे राज्यभरात लॉकडाऊन सुरू झाल्याने राज्याची विजेची मागणी दहा-बारा हजार मेगावॅटपर्यंत खाली आली होती, तर मुंबईची मागणी दीड हजार मेगावॅट एवढी नोंदली जात होती. त्यानंतर राज्य सरकारने जूनपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्याने विजेच्या मागणीत हळूहळू वाढ झाली आहे. त्यानंतर अनलॉक चार आणि पाचमध्ये सर्वच उद्योग, व्यवसाय, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. त्यामुळे आतापर्यंत 2000-2100 मेगावॅटपर्यंत अडखळत असलेली मुंबापुरीचा विजेची मागणी गेल्या दोन दिवसांपासून चक्क 2500 मेगावॅटपर्यंत पोहचली आहे. तसेच राज्यात सध्या समाधानकारक पाऊस असल्याने कृषी पंपाचा वीज वापर अत्यल्प आहे, तरीही राज्यभरातून महावितरणकडे मंगळवारी तब्बल 16 हजार 893 मेगावॅट एवढी मागणी नोंदली आहे. त्यामुळे सरकार राबवत असलेल्या अनलॉक प्रक्रियेमुळे विजेची मागणीही अनलॉक झाल्याचे दिसत आहे.
























































