
उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी उद्योगांनाही स्वस्त दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून याविषयी चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा व उद्योग विगाच्या सचिवांची बैठक घेण्यात आली.
गुजरात व कर्नाटक राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योगांना 25 ते 35 टक्के अधिक दराने वीजपुरवठा केला जात आहे. हे दर कमी करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. दरम्यान, इतर राज्यांतील वीज दरांतील तफावत, महाराष्ट्रात वीज पुरवठय़ातील त्रुटी, तांत्रिक अडचणी काय आहेत, आदी बाबींचा सखोल अहवाल सादर करण्याचे निर्देश देसाई यांनी या बैठकीत दिले. या बैठकीत एमआयडीसीने थेट वीज खरेदी करावी, त्यासाठी लागणारा खर्च उचलावा. खरेदी केलेली वीज एमआयडीसीने विकावी.
सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या सर्व पर्यायांची चाचपणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देसाई यांनी दिले. यावेळी ऊर्जा सचिव असिम गुप्ता, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.






























































