वीजेच्या प्रश्नावरून जयंत पाटलांकडून भाजप सरकार लक्ष्य, ते धाडस भाजप सरकारने दाखवले नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या राज्यात वीजेचा प्रश्न चर्चिला जात आहे. अनेक भागात काही काळासाठी वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचे वृत्त आहे. त्यावर राज्य सरकार पूर्ण लक्ष देत असून वीज पुरवठा सुरळीत रहावा, कोळसा उपलब्ध व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र यासोबतच वीजेच्या प्रश्नावरून जयंत पाटील यांनी केंद्र आणि आधीच्या भाजप सरकारला लक्ष्य केले आहे.

वीजेच्या प्रश्नासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, ‘वीजेच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार पूर्ण लक्ष देत आहे. पूर्ण तयारीने काम करत आहे. उर्जामंत्री त्यात पूर्ण लक्ष घालत आहेत. कोळसा उपलब्धीचे काही प्रश्न निर्माण झाले. महाराष्ट्राच्या वाट्याला दिलेली एक खाण रद्द करणे असे निर्णय केंद्राने घेतले, त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले पण कोळसा मिळवण्यासाठीचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत.’

गेल्या भाजपच्या सरकारच्या काळात वीज मंडळासमोर मोठे प्रश्न निर्माण केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ‘वीज मंडळापुढे मागच्या पाच वर्षात म्हणजे भाजपच्या सत्तेच्या काळात काही आर्थिक प्रश्न वीज मंडळाच्या समोर मागच्या भाजप सरकारने करून ठेवलेले आहेत. 67 हजार कोटीची थकबाकी वसूल करण्याचे धाडस भाजप सरकारने दाखवले नाही. लोकांना भ्रमात ठेवण्याचं काम तेव्हा झालं, त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत’, असे जयंत पाटील यांनी सांगितले.