खेड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु; लघु उद्योजकांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
electricity-1

मुसळधार पावसाला सुरुवात होण्याआधीच खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. वीजग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील थकीत वीजबिलधारकांचा वीजपुरठा खंडित करण्याचे आदेश महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिले गेले असल्याने येथील वीज कर्मचारी थकीत वीजबिलधारकांना वीजपुरवठा खंडित करण्याबाबत धमकावू लागले आहेत. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे वीजग्राहक आणि लघुउद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे.

खेड तालुका हा डोंगराळ तालुका आहे. या तालुक्यातील बहुतांशी गावे ही एकमेकांपासून दूर असून ग्रामीण भाग घनदाट जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस किंवा सोसाट्याच्या वाऱ्यादरम्यांन वीजवाहिन्यांवर झाड किंवा झाडांच्या फांद्या पडून किंवा गंज लागलेले वीजपोल कोलमडून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. रात्री अपरात्री अशी एखादी घटना घडली तर ग्रामीण भागातील वीजग्राहकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते. मात्र ती नैसर्गिक आपत्ती असल्याने वीजग्राहक समजून घेण्याशिवाय पर्याय नसतो.

या वर्षी मात्र कालपर्यंत म्हणजे 24 जूनपर्यंत खऱ्या मान्सूनला कोकणात सुरवातच झाली नव्हती. विजांचा कडकडाट किंवा सोसाट्याचा वाराही नव्हता. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे कारणच नव्हते. मात्र तरीही गेले काही दिवस वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीजग्राहकांनी करायचे काय? लघुउद्योजकांना आपले व्यवसाय चालवायचे कसे ? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यावर संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी याच्याही संपर्क करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या वीजग्राहकांच्या नशिबी नेहमीच निराशा येते. या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे फोन वीज गेल्यावर स्वीचऑफ झालेले असतात. आपत्काळादरम्यान अधिकारी आणि वीजकर्मचारी यांच्याशी तात्काळ संपर्क व्हावा यासाठी कंपनीने दिलेले फोन वीजपुरवठा खंडित झाल्यावर स्वीचऑफ असतील तर वीजग्राहकांनी वीजपुरवठा का खंडित झाला आहे? खंडित झालेल्या वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याबाबत चौकशी कुणाशी करायची हा प्रश्न वीजग्राहकांना पडला आहे. महावितरणने कारभारात सुधारणा केली नाही तर महावितरण कार्यलयवर मोर्चा नेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल असा इशारा संताप वीजग्राहकांनी दिला आहे. .