
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई शहरातील विजेचे दर समान करण्याची घोषणा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. ग्राहकांना खूश करणारी ही घोषणा केवळ घेषणाच राहणार आहे. मुंबई शहराला वीजपुरवठा करणाऱ्या वीज कंपन्यांचे वीजदर नुकतेच जाहीर झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विजेच्या समान दराबाबत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे विचारणा केली असता मुंबईत विजेचे समान दर करणे अशक्य असल्याचे सांगत हात झटकले आहेत. त्यामुळे ‘एक शहर एक वीजदर’ याची आशा बाळगलेल्या मुंबईकरांच्या पदरी निराशा पडली आहे.
मुंबई शहरातील सुमारे दहा लाख वीज ग्राहकांना बेस्ट वीजपुरवठा करत आहे, तर उपनगरात आदानी इलेक्ट्रिकचे जवळपास 25 लाख ग्राहक असून टाटा पॉवरचे 7 लाख आणि महावितरणचे आठ लाख ग्राहक आहेत. या सर्व कंपन्यांच्या वीज दरात मोठी तफावत असल्याने ग्राहक वारंवार नाराजी व्यक्त करत होते. त्याची दखल घेत ऊर्जा मंत्र्यांनी शून्य ते शंभर युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी विजेचा समान दर करण्याची घोषणा केली होती. त्याबाबत संबंधित कंपन्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र नुकतेच जाहीर झालेले दर पाहिले असता त्यात तफावत असल्याचे दिसत आहे. महावितरणच्या प्रतियुनिट विजेचा दर सध्या 0-100 युनिट गटातील ग्राहकांसाठी 5 रुपये 31 पैसे एवढा आहे. तर त्या तुलनेत बेस्टचा केवळ 3 रुपये 21 पैसे, टाटा पॉवर 4 रुपये 33 पैसे, आदानी 4 रुपये 50 पैसे एवढा आहे. नुकत्याच झालेल्या या दरवाढीबाबत आज आयोगाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सर्व कंपन्यांचे वीज दर समान करणे शक्य नाही. मात्र त्यातील फरक कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचे वीज आयोगाचे सदस्य मुकेश खुल्लर यांनी सांगितले. या चारही कंपन्यांचे ग्राहक वेगवेगळ्या गटातील असून त्यांना दिल्या जाणाऱया सवलतींचे खर्च वेगवेगळे असल्याने विजेचे दर समान करणे आर्थिकदृष्ट्या कंपन्यांना परवडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेस्टकडे औद्योगिक ग्राहकांची संख्या मोठी असल्याने क्रॉस सबसीडीच्या माध्यमातून छोटय़ा ग्राहकांना त्याचा फायदा होत आहे.
महावितरण राज्यात 500 वाहन चार्जिंग स्टेशन उभारणार
इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. त्या पार्श्वभूमीवर वीज आयोगाने वाहनांना चार्जिंगसाठी पुरवल्या जाणाऱ्या प्रतियुनिट विजेचा दर 6 रुपये एवढा निश्चित केला आहे. त्याची दखल घेत महावितरण राज्यात 500 चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्यापैकी पाच स्टेशन लवकरच मुंबई-पुणे महामार्गालगत उभारली जाणार असून त्याला 11 केव्हीच्या वीज वाहिनीने वीज पुरवण्यात येणार असल्याचे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी सांगितले.
कृषी पंपांचा वीज वापर पुन्हा तपासणार
महावितरण राज्यातील कृषी पंपांचा वीज वापर अवाच्या सवा दाखवून शेतकऱ्यांना वीज बिले पाठवत आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी पंपांचा वीज वापर तपासण्यासाठी राज्य सरकारने कृषी पंप वीज वापर सत्यशोधन समितीची स्थापना केली होती. त्यानुसार आलेल्या अहवालाबाबत सरकारने मौन धरले आहे. त्यामुळे नव्याने कृषी पंपांचा वीज वापर तपासण्याचा निर्णय वीज आयोगाने घेतला आहे. ही तपासणी वर्षभर चालणार आहे. तसेच वीज मीटर न बसलेल्या पंपांना मीटर बसवण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत.
आर्थिक भार सरकारने उचलला तर दर समान होतील
सध्या मुंबईतील विजेचे दर वेगवेगळे असल्याने एकाच परिसरात राहणाऱ्या ग्राहकांना कंपन्या भिन्न असल्याने वीजबिल वेगवेगळे येत आहे. ही तफावत दूर करून दरांमध्ये समानता आणण्यासाठी वाढीव दर कमी करावा लागेल. तसेच संबंधित कंपनीला सरकारने भरपाई द्यावी लागेल, असे एमईआरसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

























































