अमरावती शहरात वर्षभरात 70 लाखांची वीजचोरी उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । अमरावती

अमरावती शहरातील फक्त उपविभाग 2 मध्येच महावितरणने वीजचोरीविरूध्द वर्षभरात केलेल्या कार्यवाहीत 151 प्रकरणात 69 लाख 72 हजाराची वीजचोरी उघड झाली आहे. यापैकी 64 ग्राहकांनी 32 लाख 40 हजाराचा दंडासहीत भरणा केला आहे. तर उर्वरीत प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करत आहे.

अमरावती शहरातील उपविभाग 2 मध्ये शहरातील कॉटन मार्केट, राजकमल ,जवाहर गेट, बुधवारा,कडबी बाजार व भाजीबाजार वितरण केंद्राचा परिसर येतो. यापैकी भाजीबाजार, कडबी बाजार, बुधवारा या वितरण केंद्रांतंर्गत परिसरांमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या भाजीबाजार, लोनटेक, पाटीपुरा,न्यु ताज, महाजनपुरा, ईमाम नगर, रोशन नगर, चित्रा, ताज व नवसारी या 11 केव्ही विद्युत वाहिन्यांवर 50 टक्क्यांपेक्षा जास्त असलेली वीज हानी ही महावितरणसाठी चिंतेची बाब आहे. जास्त वीजहानीमुळे व कमी वसूलीमुळे या परिसरातील वीज वाहिनीवर आपात्कालीन परिस्थितीत भारनियमनही करावे लागते. त्यामुळे या परिसरातील नियमीत वीजबिल भरणाऱ्या प्रामाणीक ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी या परिसरातील वीज वाहिनीवरील हानी कमी करण्यासाठी कबीर नगर ,मांडवा झोपडपट्टी , मसांणगंज ,गवळीपुरा ,पॅराडाईज कॉलनी,हबीब नगर,जमजम नगर,इमली प्लॉट,पठाण चौक,छाया नगर,हाजरा नगर,उस्मान नगर, महाजन पुरा येथे वर्षभरात राबविण्यात आलेल्या वीज चोरी विरोधी मोहिमेत 69 लाख 72 हजाराची वीज चोरी उघड करण्यात आली आहे. वीज चोरी प्रकरणांमध्ये प्रामुख्याने वीज वाहिनीवर आकडा टाकणे , डिस्ट्रीब्युशन बॉक्समधून भूमिगत केबल टाकून वीज चोरी करणे ,सर्विस वायरला टॅपींग करणे , मीटरमध्ये फेरफार करणे असे धोकादायक प्रकार आढळल्याने महावितरण पुढील वर्षात वीजचोराविरूध्द मोहीम आणखी तीव्र करणार आहे.

वीज चोरांची नावे महावितरणच्या प्रत्येक वितरण केंद्राच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. तसेच वीज चोरांना बाजूच्या घरातून कोणी अनधिकृत वीज देत असेल तर त्यांच्यावरही वीज कायदा 2003 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या परिसरातील प्रामाणीक ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी महावितरण आग्रही आहे. त्यामुळे या वीज वाहिनीवरील वितरण हानी कमी करण्यासाठी व वसूलीसाठी मोहीम तीव्र करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य अभियंत्या सुचित्रा गुजर यांनी दिले आहेत.