1500 कलाशिक्षकांना निवडणूक ड्युटी, एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा पुढे ढकलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Exams
प्रातिनिधिक फोटो

विधानसभा निवडणुकीचा फटका शालेय स्तरावर होणार्‍या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षांना बसला आहे. राज्यातील तब्बल दीड हजार कला शिक्षक निवडणूक कामाच्या प्रशिक्षणात अडकल्याने 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान होणार्‍या या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय कला संचालनालयाने घेतला आहे. निवडणुकीनंतर शाळांना दिवाळीची सुट्टी असल्याने पुढे या परीक्षांना कधीचा मुहूर्त मिळेल याकडे शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

कलासंचनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी परिपत्रक काढून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट केले. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक कला संचनालयाच्या www.doa.org.in या वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असेही वाघमोडे यांनी म्हटले आहे. राज्यभरातील सुमारे 1100 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. दरम्यान, बहुसंख्य कलाशिक्षकांना निवडणुकीची कामे देण्यात आल्याने सध्या हे शिक्षक प्रशिक्षणवारीत तसेच मतदार याद्या तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. शिक्षकांअभावी या परीक्षा होणार कशा, असा प्रश्न उपस्थित झाल्याने कला संचनालयाने 26 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या या परीक्षांच रद्द केल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रश्नपत्रिकांचा तुटवडा

निवडणुकीबरोबरच काही तांत्रिक अडचणींमुळे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचे गठ्ठेच पोहोचलेले नाहीत. प्रश्नपत्रिका वितरणाचे काम अद्याप सुरूच होते. या कारणामुळेही परीक्षा पुढे ढकलल्याचे समजते. दरम्यान, ज्या परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे पोहोचले आहेत त्यांनी ते न उघडता वितरण केंद्रावर जमा करावेत, असेही कला संचनालयाने म्हटले आहे.

  • सातवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी परीक्षा होते तर आठवी ते दहावीचे विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षा देतात.
  • इंटरमिजिएट परीक्षेसाठी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • दरवर्षी सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी परीक्षा देतात.