
कला संचालनालयाने शासकीय रेखाकला परीक्षांच्या (एलिमेंटरी, इंटरमिजिएट) तारखा जाहीर केल्या आहेत. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 12 व 13 फेब्रुव्रारी तर एलिमेंटरी ग्रेड परीक्षा 14 व 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
कोरोनामुळे शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे कला संचालनालयाने याआधीच जाहीर केले होते. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा देऊ शकतात. अपवादात्मक परिस्थिती वगळता वेळापत्रकात बदल झाल्यास त्याविषयीच्या सूचना स्वतंत्रपणे कळविण्यात येतील, असे कला संचालक राजीव मिश्रा यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि इतर मार्गदर्शक सूचनाही लवकरच कळविण्यात येतील, असेही मिश्रा यांनी सांगितले. यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी केवळ एलिमेंटरी परीक्षाच दिली आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे परीक्षाच न झाल्याने या विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षा देता आलेली नाही असे विद्यार्थी आता ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने देऊन कला कोटय़ातील वाढीव गुणांचा लाभ घेऊ शकतात. बोर्डाच्या परीक्षेत कला कोटय़ातील वाढीव गुण लागू होण्यासाठी विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.






























































