अकरावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात; प्रवेशप्रक्रिया रखडली, लेक्चर्सचा पत्ता नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे जानेवारीमध्ये तरी मुंबईतील शाळा, कॉलेज सुरू होण्याची शक्यता लांबणीवर पडली आहे. याचा सर्वाधिक फटका अकरावीच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे.

अकरावीची प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याविषयी शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना कॉलेजना देण्यात आलेल्या नाहीत. अशातच पुढील दोन महिन्यांत परीक्षांना सामोरे जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी एकूण 3 लाख 20 हजार 930 जागा उपलब्ध आहेत. प्रवेशाच्या तीन नियमित आणि एका विशेष फेरीनंतर 1 लाख 35 हजार 430 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून विशेष फेरी 1 नंतर 8 हजार 856 विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत त्यांचे कॉलेजमार्फत ऑनलाइन लेक्चर्स घेण्याविषयी शालेय शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचे प्राचार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या तरी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून पहिल्यांदाच कॉलेजची पायरी चढण्याची स्वप्ने पाहणारे विद्यार्थी आयुष्याला कलाटणी देणारा बारावी परीक्षेचा अभ्यास कसा करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

उर्वरित प्रवेश कॉलेज स्तरावर पूर्ण करा

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे कॉलेजस्तरावर ऑनलाइन वर्ग सुरू होण्यास उशीर होत असल्याचे नॉन गव्हर्नमेंट कॉलेज प्रिन्सिपल असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एन. शिवारे यांनी सांगितले.

याआधीच्या प्रवेशप्रक्रिया राबविताना कॉलेजमधील 70 ते 75 टक्के जागा भरल्यानंतर लेक्चर्स घेण्याची परवानगी मिळत होती. मात्र यंदा तशा कोणत्याही सूचना कॉलेजना मिळालेल्या नसल्याने अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असेही डॉ. शिवारे म्हणाले.

पुढील आठवडय़ात निर्णय होईल

अकरावी अभ्यासक्रमाचे स्वरूप कसे असेल, अभ्यासक्रम कमी करायचा का याविषयी विचार सुरू आहे. पुढील आठवडय़ापर्यंत निर्णय घेतला जाईल. तसेच या विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायची याविषयी राज्य शिक्षण मंडळासोबत आमची चर्चा सुरू आहे.

विकास गरड

सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
याविषयी संभ्रम कायम

प्रवेशप्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे काय?

शैक्षणिक वर्षाचे दिवस वाया; अभ्यासक्रमाचे स्वरूप अस्पष्ट.

बारावी प्रवेशासाठी परीक्षा पद्धती कशी असेल?

प्रॅक्टिकल, तोंडी, लेखी परीक्षा होणार आहेत का?