
मुंबई महापालिकेच्या वतीने बोरिवलीकरांसाठी मुंबईत पहिली अत्याधुनिक ई-लायब्ररी साकारण्यात आली आहे. पाच हजार फूट जागेत असलेल्या ई- लायब्ररीच्या एक मजली इमारतीत संगणक, सभागृह तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ई-लायब्ररीचे उद्घाटन झाले. शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची ही संकल्पना आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने बोरिवली पश्चिम येथील आय. सी. कॉलनी सिलिकॉन इमारतीच्या शेजारी ही अत्याधुनिक ई- लायब्ररी उभारण्यात आली आहे. दरम्यान, नूतनीकरण केलेल्या पेट पार्कचे महापौरांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी मुंबईत पहिले आगळेवेगळे पेट केअर पार्क उभारले होते. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट 2014 साली या पेट पार्कचे उद्घाटन करण्यात आले होते. नूतनीकरणानंतर यामध्ये पाळीव प्राण्यांसाठी पूल, प्रशिक्षण केंद्र तसेच पेट केअर सेंटर बनवण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, फादर शाजी परकपल्लील, रेव्ह फादर जोसफ डेव्हिड, रेव्ह फादर रोनाल्ड फर्नांडिस, पास्टर विनू पॉल उपस्थित होते.































































