
राज्यभरात नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. वाहतूक काsंडी रोखणे आणि शहरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने उपाययोजना करण्यासाठी सोमवारी परिवहन विभागाची बैठक पार पडली. त्या बैठकीत नवीन रिक्षा आणि टॅक्सी परवाने तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन परवान्याच्या निकषांबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबईसह राज्यभरातील प्रमुख शहरांत वाढती वाहतूक काsंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याच अनुषंगाने सोमवारी मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर राज्यभर नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाने कोणत्या निकषांवर द्यावेत, याबाबत लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. सध्या राज्यभरात 14 लाखांहून अधिक रिक्षा व टॅक्सी परवाने दिलेले आहेत. महाराष्ट्रातील 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये रिक्षा व टॅक्सी परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. पेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्याला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. राज्य सरकारांना प्रवासी व माल वाहतुकीसंदर्भातील परवाने बदलण्याचा तसेच विविध योजना राबविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार सरकारने परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे.



























































