कुलगाममध्ये चकमकीनंतर धमाका : एक ठार अनेक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू- कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील लारनु गावात रविवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांत जोरदार चकमक झाली. या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमकींनंतर काय घडले हे पाहायला जमलेल्या ग्रामस्थांना एका मोठ्या धमाक्याने हादरले. या स्फोटात एक नागरिक ठार झाला आणि अनेकजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कुलगामच्या लारनु गावात काही दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळताच सुरक्षा दलांच्या जवानांनी तिकडे धाव घेतली. लष्कराने या दहशतवाद्यांना शरण यायचे आवाहन केले. पण दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केल्याने लष्करी जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीनंतर नागरिकांनी घटनास्थळी येऊ नये असे आवाहन पोलीस करत होते. तरीही अनेक नागरिक तेथे पोहचले. त्यावेळी दहशतवाद्यांनी आणलेल्या स्फोटकांचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात एक ग्रामस्थ जागीच ठार झाला तर अनेकजण जखमी झाले. त्यानंतर लष्करी जवान,पोलीस आणि केंद्रीय राखीव दल पोलिसांनी जखमींना स्थानिक रुग्णालयांत दाखल केले. गंभीर जखमींना श्रीनगरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. लारनु गावात लपलेल्या दहशतवाद्यांना घेरून जम्मू कश्मीर पोलीस , सीआरपीएफ आणि लष्करी दलाच्या जवानांनी सुमारे 5 तास जोरदार प्रतिकार केला.या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले ,पण चकमकीत 2 जवान गंभीर जखमी झाले.त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.