पाथर्डीत अतिक्रमणांवर हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी पालिकाहद्दीत असलेल्या अतिक्रमणांवर आज पालिका, महसूलच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात हातोडा टाकला. या कारवाईत सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली. किरकोळ अपवाद वगळता सर्व कारवाई शांततेत पार पडली. या कारवाईमुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

पाथर्डी पालिका हद्दीतून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमण करण्यात आली आहेत. ही अतिक्रमणे काढावीत, यासाठी पालिकेने अतिक्रमणधारकांना अनेकदा नोटिसा बजावल्या. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. अतिक्रमण हटविण्याबाबत काल पालिका, महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली होती. यामध्ये अतिक्रमणावर आज हातोडा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार आज सकाळी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. प्रारंभी काहींनी या मोहिमेला विरोध केला. त्यानंतर अनेकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. आज केलेल्या कारवाईत खरेदी विक्री संघाच्या कार्यालयासमोरील, अजंठा चौक, कोरडगाव चौकातील अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पालिकेकडे जाणाऱया रस्त्याच्या बाजूच्या अतिक्रमणाबाबत न्यायालयात अपील दाखल असल्याने अतिक्रमणे काढू नका, अशी विनंती प्रताप ढाकणे यांच्या नेतृवाखाली व्यापाऱयांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याकडे केली. मात्र, अतिक्रमण काढून घेण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे गेले असता व्यावसायिकांनी त्यांना जोरदार विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. आज सुरू झालेली मोहीम उद्याच्या आठवडे बाजारनंतर सुरू राहणार असल्याची माहिती लांडगे यांनी दिली.