ऊर्जा संवर्धनाचे शिवधनुष्य

734

>> अभय यावलकर

ऊर्जा संवर्धन दिन म्हणून 14 डिसेंबर हा दिवस पाळला जातो. काळाच्या प्रवाहाबरोबर चालायचे असेल तर नुसती समृद्धी आहे म्हणून चालणार नाही तर त्याबरोबर वैचारिक समृद्धी आवश्यक ठरणार आहे. दोन दशकांपूर्वी लिहिता-वाचता आले पाहिजे इतकेच साक्षरतेचे महत्त्व होते, परंतु माणसाच्या दैनंदिन व्यवहारांनी आता लांबचा पल्ला गाठला आहे. रोजच्या व्यवहारात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर प्रचंड वेगाने होत आहे. ‘मी त्यासाठी पैसे मोजतो आणि मला पाहिजे ते मी करेन’ ही मिजास बाजूला करूनच प्रत्येकाला ऊर्जा संवर्धन करावे लागणार आहे. पुन्हा या संवर्धनाचा आवाका वीज वाचवा अथवा वीज बचत करा इतकाच मर्यादित नसून मानवजातीला लागणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि वस्तूत संवर्धन दडलेले आहे. ऊर्जा संवर्धनाचे ‘शिवधनुष्य’ आपल्याला पेलावेच लागेल.

आम्ही आमच्या व्यावहारिक भाषेत बोलताना म्हणतो ‘जसं कराल तसं भराल.’ पण हे सत्य शास्त्रीय भाषेत पण एका वेगळ्या अंगाने मांडले गेले. त्याची अनुभूती आपण सर्वजण आज घेत आहोत. जगद्विख्यात भौतिक शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांनी गतीविषयक शास्त्रशुद्ध भाषेत नियम मांडताना म्हटले की, क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल हे नेहमीच सारखे असते. हा नियम सांगताना ते म्हणाले की, ही वास्तवता सर्व घटनांसाठी लागू आहे. हा नियम आम्ही फक्त अभ्यासात अभ्यासतो. पण वाचकहो, विचाराअंती सर्वांनाच असे लक्षात येईल की, हे त्रिकाल सत्य आहे. आपण निसर्गाशी जसे वागणार तसेच आपल्या बरोबर घडणार आहे. आज प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपण गेलेला नुकताच पावसाळा अनुभवला. निसर्गचक्र कसे बदलते आहे हे आम्ही अनुभवतो आहोत, दिल्लीतील प्रदूषणाच्या अतिरेकाचा सामना आम्ही करत आहोत, पिकांचा झालेला ऱ्हास आम्ही पाहिला. अशी किती ना किती उदाहरणे देता येतील. ही वाटचाल काहीशी विनाशाकडे नेणारी आहे. काळ बदलतो आहे. आपणही बदलले पाहिजे, पण बदलताना विनाशाकडे वाटचाल होऊ नये अशी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्ट तयार होताना ऊर्जेशिवाय तयार होत नाही. या ऊर्जेची वेगवेगळी रूपं आपण उपयोगात आणत असतो. पैसे देऊन ही प्रारूपे उभी करता येणार नाहीत आणि म्हणूनच प्रत्येकाला ऊर्जा संवर्धनाची जाणीव झाली पाहिजे.

मुळात ऊर्जा या शब्दाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. आम्ही फक्त लाकूड, कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि वीज इतकेच स्रोत म्हणजे ऊर्जा समजत आलेलो आहोत. आणि यांची बचत म्हणजेच ऊर्जा बचत इतकीच त्याची व्याप्ती समाजात रूढ आहे. पण शेतात पिकणाऱ्या 1 कि.ग्रॅ. गव्हाला 1200 लिटर पाणी तर भाताला 1800 लिटर पाणी लागते. याशिवाय सूर्यप्रकाशही लागतो. पण पाणी, सूर्यप्रकाश यासारखे स्रोत मोफत मिळत असल्याने आम्हाला त्याची जाणीवच होत नाही. शेतात पिकणाऱ्या, कारखान्यात तयार होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे माणसांची, जनावरांची आणि यंत्रांची किती मेहनत आहे हे कळतच नाही. त्यामुळेच काय तर फुकट मिळणाऱ्या गोष्टीची आपल्याला खऱ्या अर्थाने किंमतच कळत नाही हेच खरे. पण जी नैसर्गिक साधनसंपत्ती मोफत मिळते म्हणून कसेही वापरले तर त्याचे परिणाम तितक्याच उच्च कोटीचे म्हणजे पैसे देऊन थोपवता न येण्यासारखेच असतात आणि म्हणूनच नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन फार महत्त्वाचे ठरते.

येथे सजीवसृष्टीतील एक सत्य उदाहरण सांगावेसे वाटते की, ज्यामुळे एक घटकच या पृथ्वीतलावरून कसा कायमस्वरूपी नष्ट झाला. मादागास्कर बेटावर डोडो पक्ष्याची शिकार होत असायची. चवीला उत्कृष्ट असल्याने प्रमाणाबाहेर शिकार झाली. डोडो संपलेत, पण ते एकटे संपले नाहीत तर त्यासोबत कल्वेरिया मेजर नावाचे वृक्षही संपलेत. कारण कल्वेरिया मेजर या झाडाची टणक फळे डोडो खात असे आणि त्यांच्या विष्ठेतून या झाडाच्या बियांचा प्रसार होत असे. आजमितीला मात्र आपल्या सजीवसृष्टीतून या दोन्ही गोष्टी संपुष्टात आलेल्या आहेत. हे उदाहरण सांगण्यामागचा हेतू हाच आहे की, ऊर्जा वापराचा अतिरेक झाला तर भविष्यात आपल्याला आपला मार्गच पूर्णपणे बदलावा लागेल आणि या मार्गात मात्र काही जाती-प्रजाती नष्ट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी ऊर्जा संवर्धन महत्त्वाचे ठरते.

आपण वापरत असलेले कपडे हे कापसापासून तयार होतात हे सर्वांनाच माहिती आहे, पण 1 कि.ग्रॅ. कापसाच्या उत्पादनाला सुमारे 7500 ते 8000 लिटर पाणी लागते. फक्त पाणी असूनच चालणार नाही तर पीक तयार होताना लागणारा सूर्यप्रकाश आणि त्यातून होणारे प्रदूषण याचा विचार करता दर एकरी 300 पौंड म्हणजे सुमारे 136 किग्रॅ. कार्बनचे उत्पादन होते. अर्थातच याची तुलना 275 किवॉअ. इतक्या विजेबरोबर करता येईल. यातील महत्त्वाचा भाग लक्षात घेता असे दिसून येईल की, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि इतर वायू लक्षात घेतल्यास ते थोपवण्याची नैसर्गिक व्यवस्थेशिवाय कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही आणि म्हणूनच नुसते पैसे मोजून आपला कार्यभार संपला असे होत नाही. कारण यापेक्षा चारपटीने जरी कोणी पैसे दिले तरी आपण ते निर्माण करू शकणार नाही आणि म्हणूनच दैनंदिन व्यवहारातील प्रत्येक गोष्ट ही प्रचंड मौल्यवान आहे. ती पैसे देऊन खरेदी करता न येण्यासारखीच आहे. या निसर्गाचे ऋण जगातील श्रीमंतदेखील चुकवू शकत नाही आणि म्हणूनच आपण सर्वांनीच प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त उपयोगात आणून जर तिची उपयुक्तता वाढवली आणि यातूनच ऊर्जेच संवर्धन केले तर निसर्गाचे देणे ऊर्जा संवर्धनाच्या निमित्ताने काहीसे चुकते करता येईल.

वीज भारनियमन महाराष्ट्राला चांगलेच माहीत आहे. त्या काळात शेती व्यवसाय, लघुउद्योग डबघाईस आले आणि यातूनच जनसामान्यात मोठी खळबळ माजली होती. यातूनच सौरऊर्जेचा पर्याय पुढे आणून हजारो नागरिकांना सौरऊर्जेचे प्रशिक्षण दिले गेले आणि आज आपण पाहत आहोत सर्वत्र सौरऊर्जेचा प्रसार आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे. 2035 सालापर्यंत जगाच्या 18 टक्के ऊर्जा वापर करणारा हिंदुस्थान देश असेल. देशातील पारंपरिक इंधनाची स्थिती पाहता शाश्वत सौर आणि पवन ऊर्जेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने भर देण्याची पावले उचलली जात आहेत. आजमितीला आपला देश सौरऊर्जेच्या वापरात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याशिवाय 275 मेगावॅटचे सौर औष्णिक सयंत्रणा आपल्या देशात बसविण्यात आल्या आहेत. ज्यामुळे कोळशाची बचत झालेली आहे. याशिवाय दररोज निर्माण होणारा सुमारे 1000 किग्रॅ कार्बनडाय ऑक्साईड वायूची निर्मिती थांबलेली आहे. पवन ऊर्जेचे चित्रही उत्तम असून आजमितीला सुमारे 30 गिगावॅट क्षमतेची यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि ते 2022 पर्यंत पूर्णत्वास येईल अशी आशा आहे.

भविष्यातील आव्हाने
आज हिंदुस्थानी व्यवस्थेचा मोठा भाग हा शेती व्यवसाय असून यातील प्रत्येक उत्पादनाची उपयुक्तता वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवणे महत्त्वाचे आहे. जनावरांच्या चाऱ्यापासून दुग्धजन्य पदार्थापर्यंत, शेतातील कचऱ्यापासून तेलनिर्मिती, नैसर्गिक खतनिर्मिती, ऊर्जानिर्मिती इ. बरोबरच आधुनिक शेतीचा विकास महत्त्वाचा आहे. शेतातील लाखो टन कचरा ही राष्ट्राची संपत्ती आहे. या कचऱ्यातूनच अब्जावधी रुपयांचे उत्पादन घेता येणे शक्य आहे. त्यासाठी मूलभूत पाया तयार करणे आवश्यक आहे.

दर चौरस किमी क्षेत्रफळावर 50 ते 60 मेगावॅट क्षमतेचे सौरवीजनिर्मिती संयंत्र बसवून अतिदुर्गम भागापर्यंत वीज पोहचवणे आवश्यक आहे. अजूनही 100 गिगावॅटपर्यंतचा पल्ला आपल्याला गाठावयाचा आहे. पेट्रोल, डिझेल आणि इतर जैविक इंधने पुढील दहा वर्षांत संपुष्टात येतील त्यावेळी विजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती, त्यांचा वापर वाढवणे, रुग्णालये, हॉटेल्स, कार्यालये इ. संस्थामधून सौरऊर्जेचा वापर वाढवणे गरजेचे होणार आहे. आपण सर्वांनी जर सकाळपासून सायंकाळपर्यंत आपल्या मूलभूत गरजांमध्ये डोकावून पाहण्याचा आणि त्याची उपयुक्तता वाढवण्याचा विचार केला तर आणि तरच ऊर्जा संवर्धन होऊ शकणार आहे. तुकाराम महाराजांच्या या महाराष्ट्रात अंगातला सदरा फाटल्यानंतर त्याचे उशीचे आच्छादन, आच्छादनाचे पायपुसणे, पायपुसणे जीर्ण झाल्यानंतर निघणाऱ्या धाग्यांपासून वात आणि त्या वातीपासून मिळणाऱ्या निरभ्र प्रकाशापर्यंतची वाटचाल आपल्या हिंदुस्थानींनी केलेली आहे. ती तशीच राहिली तरच खऱ्या अर्थाने ऊर्जा संवर्धन होऊ शकेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या