
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज वक्फ बोर्डाकडे आपला मोर्चा वळवला. पुणे जिह्यातील मुळशी तालुक्यात आयटी पार्क हिंजवडी येथील ताबूत इनाम इंडोमेंट बोर्ड ट्रस्ट या वक्फ बोर्ड अंतर्गत नोंद असलेल्या संस्थेवर आज ईडीने छापा मारला. वक्फ बोर्डाशी संबंधित सात ठिकाणांवर छापे पडल्याची चर्चा आहे.
ताबूत इनाम इंडोमेंट बोर्ड ट्रस्टच्या मालकीची ही चार हेक्टर जमीन आहे. यासंदर्भात मुस्ताक अहमद शेख यांनी ईडीकडे तक्रार केली होती. तक्रार केल्यानंतर ताबडतोब हा ट्रस्ट आणि जमिनीवर ईडीने कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कारवाईनंतर वक्फ बोर्डाशी संबंधित ठिकाणी ईडीने छापे टाकल्याचे वृत्त पसरले. परंतु, ते ताबूत इनाम इंडोमेंट बोर्ड ट्रस्टशी संबंधित होते.
दोघे ताब्यात
संबंधित प्रकरणी ईडीने पुण्यातून दोघांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नाहीत. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानुसार त्यांना अटकही करण्यात आली होती. मात्र, जामिनावर त्यांची सुटका झाली होती, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
मलिकांचे आव्हान, 30 हजार संस्थांचीही चौकशी करा!
महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर ईडीने छापा मारला नाही, बोर्डाकडे नोंदणी असलेल्या संस्थेशी संबंधित जमीन प्रकरणातील गुह्याच्या अनुषंगाने ते छापे आहेत, असे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केले. वक्फ बोर्डाकडे 30 हजार संस्थांची नोंदणी असून त्या सर्वांची ईडीने तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. वक्फकडील संस्थांचे व्यवहार तपासल्यास भाजप नेते व आमदार तुरुंगात जातील, असा इशाराही मलिक यांनी दिला.





























































