
सामना ऑनलाईन । नॉटिंगहॅम
विराट कोहलीचा हिंदुस्थानी संघ येथे सुरू असलेला तिसरा कसोटी सामना जिंकण्याच्या उंबरठय़ावर उभा आहे. कसोटी पुनरागमन करणाऱया जसप्रीत बुमराहच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने इंग्लंडचा पाय खोलात नेला. पण जोस बटलर, बेन स्टोक्स आणि अदिल रशीद यांच्या कडव्या झुंजीमुळे इंग्लंडने चौथ्या दिवशी पराभव टाळला. टीम इंडियाकडून मिळालेल्या 521 धावांचा पाठलाग करणाऱया इंग्लंडने चौथ्या दिवस अखेरीस 9 बाद 311 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणखी 210 धावांची गरज आहे. हिंदुस्थानला या कसोटीत विजय मिळवण्यासाठी फक्त एकाच बळीची गरज आहे. आता उद्या ही कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेचे आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाची ब्रिगेड सज्ज असेल.
इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे इंग्लंडची अवस्था 4 बाद 62 अशी झाली होती. पण जोस बटलर (106 धावा) व बेन स्टोक्स (62 धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी करीत टीम इंडियाच्या गोलंदाजांना चांगलेच सतावले. पण जसप्रीत बुमराहने जोस बटलरला बाद केले आणि जोडी फोडली. जसप्रीत बुमराहने 85 धावा देत पाच फलंदाज बाद केले.


























































