
सामना प्रतिनिधी । वसई
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या ऑसिडहल्ल्यात मर्चंट नेव्हीमधील अभियंत्याचा मृत्यू झाला असून त्याची सहकारी मैत्रीण जखमी झाली आहे.
दहिसर येथे कांदरपाडा येथे राहणारे अविनाश तिवारी (41) मंगळवारी रात्री आपल्या मैत्रिणीसह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलात जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते रात्री अडीचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने घरी जाण्यासाठी निघाले होते. तिवारी यांनी आपली दुचाकी विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत टाकली आणि रस्ता ओलांडण्यासाठी थांबले. त्यावेळी अचानक समोर आलेल्या एका अज्ञात इसमाने दोघांवर ऑसिड फेकले. तिवारी लगेच जवळच्या पेट्रोलपंपाजवळ गेले आणि तिथे असलेल्या लोकांनी पाणी मारून ऑसिडची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऑसिडमुळे गंभीर भाजल्याने त्या दोघांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचाराला नेत असताना वाटेतच तिवारी यांचा मृत्यू झाला. तिवारी यांच्या मैत्रिणीच्या हातावर आणि चेहर्यावर जखमा झाल्या आहेत. तिची प्रकृती स्थिर असून रुग्णालयातून उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले.
तिवारी हे मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांचा घटस्फोट झाला आहे. वसईतील वालीव पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाच्या सर्व शक्यता पडताळून तपास करत आहोत. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तसेच अन्य पुरावा शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली.



























































