
सामना प्रतिनिधी, मुंबई
ग्रामीण भागांमधील अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) आणि तंत्रशिक्षण संस्थांचा ‘मेकओव्हर’ होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) वतीने त्यांना अद्ययावत उपकरणे पुरवली जाणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘मॉडरॉब्स’ या योजनेंतर्गत त्यासाठी 20 लाखांपर्यंत निधी दिला जाणार आहे.
ग्रामीण भागांमधील अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) आणि तंत्रशिक्षण संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा असे एआयसीटीईने कळवले आहे. अद्ययावत उपकरणे ही विशेषतः या संस्थांमधील प्रयोगशाळा, कार्यशाळा यांना दिली जाणार आहेत.
शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी या संस्थांची क्षमता वाढवण्याचा उद्देश यामागे असल्याची माहिती एआयसीटीईच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. उद्योग जगताची मागणी पूर्ण करता येईल असे काम या संस्थांमध्ये होण्याची गरज आहे. प्रयोगशाळांमधील जुनी उपकरणे हटवून त्याजागी नवी उपकरणे पुरवली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. स्थानिक उद्योग डोळ्यांसमोर ठेवून कोणती उपकरणे पुरवायची याचा निर्णय तज्ञ मंडळी घेणार आहेत. त्यासाठी ग्रामीण भागांमधील इंजिनीयरिंग व टेक्नॉलॉजी संस्थांची पाहणीही केली जाणार आहे.



























































