तुरुंगवासात कैद्याने बनवलं सॉफ्टवेअर, अमित मिश्राचे सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुरुंगात गेल्यावर भलेभले नैराश्यात जातात. दिवसरात्र आपल्या भविष्याचा विचार करत बसतात. मात्र अमित मिश्रा नावाच्या कैद्याने एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. विशेष म्हणजे तुरुंगात शिक्षा भोगत असताना तयार केलेले हे सॉफ्टवेअर तुरुंगाचे व्यवस्थापन सुधारण्यासंदर्भातील आहे. याबद्दल सर्वेच्च न्यायालयानेही अमितचे कौतुक केले आहे.

काही वर्षांपूर्वी अमितच्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या माहेरच्या लोकांनी अमितवर हत्येचा आरोप केला. या प्रकरणामध्ये अमितला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला 13 महिन्यांसाठी हरियाणामधील गुरुरुग्राममधील तुरुंगामध्ये ठेवण्यात आले होते. याच कालावधीत त्याने हे सॉफ्टवेअर विकसित केले. अमितवर खटला सुरू झाला. त्यानंतर काही दिवसांनी त्याला तुरुंगातून सोडण्यात आले.

सर्वेच्च न्यायालयाने काल अमित मिश्रा याचे कौतुक केले. सर्व राज्यांनी अमितने बनवलेलं सॉफ्टवेअर पाहावं, असा सल्ला संजय किशन कौल आणि हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने दिले. तुरुंगांमधील सुधारणांसाठी हे सॉफ्टवेअर अत्यंत उपयोगी ठरू शकते. त्यामुळे फक्त हरियाणाच नाही तर देशातील इतर राज्यांनीही सॉफ्टवेअर बघितले पाहिजे, असे सर्वेच्च न्यायालयाने म्हटले आहे.

हरयाणा, राजस्थानमध्ये होतोय वापर

अमितने बनवलेल्या सॉफ्टवेअरमुळे कोणत्याही कैद्यासंदर्भातील रियल टाइम एन्ट्री करता येते. म्हणजेच हा कैदी तुरुंगामध्ये कसा राहतो, काय करतो, इतरांशी कसा वागतो या सर्व गोष्टींची सॉफ्टवेअरच्या  मदतीने नोंद ठेवता येणार आहे. या सॉफ्टवेअरला ‘फिनिक्स’ असे नाव देण्यात आले आहे. सध्या हे सॉफ्टवेअर हरियाणामधील 19 जिह्यांमध्ये वापरले जात आहे. त्याचबरोबर राजस्थान, उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील क़ाही जिह्यांमध्ये या सॉफ्टवेअरची  मदत तुरुंग प्रशासनाकडून घेतली जात असल्याची माहिती अमितने दिली आहे.