
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रथम वर्ष इंजिनीयरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आणि हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आज अचानक स्थगित करण्यात आली. लाखो विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी तसेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे (कॅप) अर्ज भरले होते. एकाच वेळी लाखो विद्यार्थी नोंदणी व अर्ज भरू लागल्याने सर्व्हरवर भार येऊन तो हँग झाला असे राज्याच्या सीईटी सेलनेच आज कबूल केले. 24 जूनपासून नव्याने अर्ज भरणे सुरू केले जाणार आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरावे लागणार आहेत.
राज्य सीईटी सेलच्या वतीने ‘सार’ पोर्टलवर प्रवेश नोंदणी तसेच प्रथम वर्ष इंजिनीयरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आणि हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे (कॅप) काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी सीईटी सेलच्या वेबसाईटवर वेळापत्रक देण्यात आले होते. लाखो विद्यार्थ्यांनी सार पोर्टलवर नोंदणी केली होती तसेच सीईटी पोर्टलवर कॅपचे अर्ज ऑनलाइन भरले होते. परिणामी एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी व अर्ज भरणा सुरू केल्याने सर्व्हरवरील भार वाढला होता. अनेक ठिकाणी सार पोर्टलची लिंक त्यामुळे मिळत नव्हती. विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती एकत्र करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अर्जाच्या प्रती मुद्रित करताना ते विद्यार्थ्यांच्या लक्षात आले होते आणि हजारो विद्यार्थ्यांनी त्याबाबत सीईटी सेलकडे तक्रारी केल्या होत्या.
अशा सदोष माहितीच्या आधारे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे अयोग्य असल्याचे तज्ञांनी सांगितले होते. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरणा तसेच भरलेल्या अर्जांची व अपलोड केलेल्या कागदपत्रांची सेतू सुविधा केंद्रावर पडताळणी करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. ती नव्याने सुरू करण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सीईटी सेलने कळवले आहे.




























































