विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, इयॉन मॉर्गनकडे कर्णधारपदाची धुरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

यजमान इंग्लंडने 30 मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आपला 15 खेळाडूंचा संघ बुधवारी जाहीर केला. इयॉन मॉर्गनकडे या संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे, मात्र हा अंतिम संघ नसून यात बदलही होऊ शकतो.

पाकिस्तानविरुद्ध 19 मेला होणाऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर इंग्लंडच्या विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघांची घोषणा होईल. इंग्लंडने आपल्या संघात 6 फलंदाज, 6 अष्टपैलू आणि 3 गोलंदाज निवडले आहेत. आदिल रशीद, मोईन अली व जो डेनली या फिरकी त्रिकुटाला संघात स्थान मिळाले आहे. डेनली हा फलंदाजीही करू शकतो. लियाम प्लंकेट व मार्क वुड यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, टॉम करन, डेव्हिड विली हे खेळाडू अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत असतील. ‘आयपीएल’मध्ये खेळत असलेले इंग्लंडचे खेळाडू 26 एप्रिलपूर्वी विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परततील.

जोफ्रा आर्चरला अजूनही संधी
सध्या ‘आयपीएल’मध्ये लक्ष्यवेधी कामगिरी करत असलेल्या जोफ्रा आर्चरला विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. वेस्ट इंडीजच्या जोफ्रा आर्चरने इंग्लंडचे नागरिकत्व पत्करले आहे. त्याला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय व टी-20 मालिकेसाठी आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात वर्णी लागली आहे. या संघांचीही बुधवारीच घोषणा झाली. त्यामुळे पाकिस्तान व आयर्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी करून जोफ्राला इंग्लंडच्या विश्वचषक संघात स्थान मिळविण्याची संधी असेल.

‘विश्वचषकासाठी इंग्लंडचा चमू- इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टॉ, जोस बटलर, टॉम करन, जोए डेनली, ऍलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड. पाकिस्तानविरुद्धचा इंग्लंडचा वन डे संघ ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टॉ, जोस बटलर, टॉम करन, जोए डेनली, ख्रिस जॉर्डन, ऍलेक्स हेल्स, लियाम प्लंकेटस, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेविड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

पाकिस्तान व आयर्लंडविरुद्धचा टी-20 संघ- इयॉन मॉर्गन, जोफ्रा आर्चर, सॅम बिलिंग्स, टॉम करन, जोए डेनली, ख्रिस जॉर्डन, ऍलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, जेम्स विन्स, डेविड विली, मार्क वुड.