बेअरस्टॉचा शतकी धमाका, इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा

सामना ऑनलाईन । ब्रिस्टॉल

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी जबरदस्त कामगिरी केल्यानंतर जॉनी बेअरस्टॉने इंग्लंडसाठीही सर्वस्व पणाला लावले आहे. जॉनी बेअरस्टॉच्या शतकी झंझावातात मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानचा पालापाचोळा झाला. त्याने अवघ्या 93 चेंडूंत पाच सणसणीत षटकार व 15 दमदार चौकारांनिशी 128 धावांची खेळी साकारल्यामुळे इंग्लंडला पाकिस्तानवर सहा गडी व 31 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवता आला. जॉनी बेअरस्टॉचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

पाकिस्तानकडून मिळालेल्या 359 धावांचा पाठलाग करणाऱया इंग्लंडने चार गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टॉने पहिल्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. जेसन रॉयने 55 चेंडूंत 76 धावांची खेळी साकारली. त्यानंतर जो रूटने 43 धावांची, बेन स्टोक्सने 37 धावांची आणि मोईन अलीने नाबाद 46 धावांची खेळी साकारत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकने 131 चेंडूंत 151 धावांची खेळी साकारली. हारीस सोहेलने 41 धावांची, आसीम अलीने 52 धावांची खेळी साकारली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक चार फलंदाज बाद केले.