गेलने शतक ठोकले, पण… ; इंग्लंडचा विंडीजवर सहज विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ब्रिजटाऊन 

ख्रिस गेल नावाचे वादळ मैदानावर घोंगावल्यावर प्रतिस्पर्धी संघाची खैर नसते. यावेळीही गेलचे वादळ घोंगावले, त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडपून शतकीही ठोकले. त्याने एकट्याने 12 षटकारांचा घणाघात केला. मात्र, जेसन रॉय आणि जो रूट यांनीही झंझावाती शतके ठोकून इंग्लंडला वेस्ट इंडीजविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सहज विजय मिळवून दिला. इंग्लंडने कारकिर्दीत सर्वाधिक धावांचा पाठलाग करून हा विजय मिळविला, हे विशेष. याचबरोबर इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

विंडीजकडून मिळालेले 361 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य इंग्लंडने 48.4 षटकांत केवळ 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 364 धावा करून पूर्ण केले. जेसन रॉय (123) व जॉनी बेअरस्टोव (34) यांनी 10.5 षटकांत 91 धावांची सलामी दिली. बेअरस्टोव बाद झाल्यानंतर आलेल्या जो रूटनेही (102) शतकी खेळी करीत रॉयला चांगली साथ दिली.

विंडीजचा तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेलने तब्बल 18 महिन्यांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. या तुफानी फलंदाजाने इंग्लंडच्या गोलंदाजांना बेदम चोपून काढताना 135 धावांच्या खेळीत 12 गगनभेदी षटकार लगावले. बार्बाडोसच्या मैदानावर त्याने लगावलेल्या षटकारांपैकी आठ चेंडू थेट मैदानाच्या बाहेर गेल. त्यामुळे पंच चांगलेच त्रस्त झाले.