
सध्या चीनमधल्या कोरोना व्हायरसने जगभर दहशत पसरवली आहे. त्यामुळे जगभरातून चिनी वस्तू आणि पदार्थांची मागणी घटली आहे. किंबहूना अनेक देश आणि राज्यांमधून चिनी पदार्थ हद्दपार करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत एका चिनी हॉटेलमधल्या मांसात माणसाचा दात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना इंग्लंडच्या वर्सेस्टर इथे घडली आहे. येथील एका जोडप्याने न्यू टाऊन कॅन्टनीज टेकअवे नावाच्या एका चिनी हॉटेलमधून एका जोडप्याने पोर्क करी अर्थात डुकराचं मांस असलेली रस्साभाजी मागवली. जेव्हा हे जोडपं जेवायला बसलं, तेव्हा त्यांना त्यात एक विचित्र वस्तू आढळली. त्यांनी ती नीट धुवून तपासली, तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण तो मानवी दात होता. हे पाहून हडबडलेल्या जोडप्याने त्वरित हॉटेल प्रशासनाशी संपर्क साधला आणि पोलिसांनाही कळवलं.
या दरम्यान, झालेली चूक निस्तरण्यासाठी हॉटेल प्रशासनाने त्यांना मोफत भोजनाची ऑफर दिली. मात्र, या जोडप्याने त्याला नकार दिला. पोलिसांच्या पथकाने येऊन नीट तपासणी केली. तेव्हा या हॉटेलने स्वच्छता आणि सुरक्षेच्या कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं त्यांना आढळलं. तसंच हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे दात तपासले गेले. त्यातही त्यांना काहीही आढळलं नाही. त्यामुळे या हॉटेलवर कोणतीही कारवाई न करण्याचा तसंच हॉटेलचे रेटिंग न घटवण्याचा निर्णय घेण्यात आला.





























































