इंग्लंड संघ बनणार हजारी मनसबदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

क्रिकेट या खेळाची जननी असलेल्या इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासाला आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला जाणार आहे. हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यान १ ऑगस्टपासून कसोटी मालिकेस प्रारंभ होणार आहे. या सलामीच्या सामन्याबरोबरच इंग्लंडचा संघ एक हजार कसोटी खेळणारा पहिला देश ठरणार आहे. एक हजाराव्या सामन्यात खेळण्याचा गौरव प्राप्त करण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू कमालीचे उत्सुक झाले आहेत.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान १८७७ मध्ये पहिला कसोटी क्रिकेट सामना खेळला गेला होता. मात्र सर्वप्रथम एक हजार मनसबदार बनण्याचा पहिला मान इंग्लंडला मिळणार आहे. इंग्लंड संघाने आतापर्यंत ९९९ कसोटी सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ८१२ कसोटी सामने खेळले असून हा संघ दुसर्‍या स्थानावर आहे. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत २३१३कसोटी सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडीज (५३५) व हिंदुस्थान (५२२) हे अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या स्थानावर आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिका (४२७), पाकिस्तान (२७४), श्रीलंका (२७४), बांगलादेश (१०८), झिम्बाब्वे (१०५) आणि आयसीसी वर्ल्ड इलेव्हन, अफगाणिस्तान व आयर्लंड (प्रत्येकी एक) या देशांचा क्रमांक लागतो.

सर्वाधिक विजय ऑस्ट्रेलियाच्या नावावर

सर्वाधिक कसोटी खेळण्यामध्ये इंग्लंडचा नंबर लागत असला तरी सर्वाधिक विजयाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर आहे.  ऑस्ट्रेलियाने विक्रमी ३८३ कसोटी जिंकल्या आहेत, तर इंग्लंड ३५७ विजयासह दुसर्‍या स्थानावर आहे. इंग्लंडला २९७ कसोटीत पराभवाचे तोंड पाहावे लागले, तर ३४५ सामने अनिर्णीत राहिले.