लॉर्डस् जिंकण्यासाठी हिंदुस्थान सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लंडन

हिंदुस्थान – इंग्लंड यांच्यामध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दोन्ही संघांमध्ये कमालीची चुरस दिसली, पण दबावाखाली यजमान इंग्लंडने आपला खेळ उंचावला आणि कसोटी सामना खिशात घातला. फक्त आणि फक्त कर्णधार विराट कोहलीच्या वन मॅन शोच्या जोरावर पहिला सामना जिंकू पाहणाऱया पाहुण्यांना जबर धक्का बसला. आता आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थानसमोर उद्यापासून लॉर्डस् या क्रिकेटच्या पंढरीत सुरू होणाऱया दुसऱया कसोटीत विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्याचे आव्हान असेल. याप्रसंगी एकीकडे बेन स्टोक्सची अनुपस्थिती इंग्लंडसाठी धोकादायक ठरू शकते, तर दुसरीकडे कोणत्या अकरा जणांना अंतिम संघात स्थान द्यायचे यावरून हिंदुस्थान संभ्रमात असेल यात शंका नाही.

क्रिकेटची पंढरी! ‘या’ खेळाडूंनी गाजवले लॉर्डसचे मैदान

गोलंदाजी विभागात काय होणार…

गोलंदाजी विभागात रविचंद्रन अश्विन व इशांत शर्माने आपली चुणूक दाखवलीय. पण जसप्रीत बुमराह अद्याप फिट झालेला नाही. त्यामुळे उमेश यादव व मोहम्मद शमी यांना वगळण्यात येईल की नाही याबाबत निश्चित काही सांगता येत नाही. तसेच डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याची गोलंदाजी इंग्लंडच्या कसोटी संघांतील बहुतांशी फलंदाजांना ठाऊक नाही. त्यामुळे त्याला संधी देण्यात आल्यास आश्चर्य वाटणार नाही. टीम इंडिया दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. अष्टपैलू हार्दिक पांडय़ालाही आपला खेळ उंचावावा लागणार आहे.

कोणाचा पत्ता कट अन कोणाला मिळणार संधी

पहिल्या कसोटीत विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाला आपला ठसा उमटवता आला नाही. त्यामुळे फलंदाजी विभागात बदल होण्याचे संकेत आहेत. यामध्ये शिखर धवन व लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला बसवून कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराला खेळवण्यात येईल असा अंदाज बांधला जात आहे. तसेच गेल्या काही महिन्यांत बॅटमधून धावा निघत नसल्यामुळे उपकर्णधार अजिंक्य रहाणेही दबावाखाली असेल यात वाद नाही.

यजमानांची योजना

इंग्लंडच्या पहिल्या कसोटीतील विजयात अष्टपैलू बेन स्टोक्स याने मोलाची भूमिका बजावली होती. पण तो दुसऱया कसोटीत खेळू शकणार नाही.

… म्हणून बेन स्टोक्स दुसऱ्या कसोटीतून बाहेर

पण तरीही यजमानांना मोठे टेन्शन नाहीए. जेम्स ऍण्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड व सॅम करण या तीन मध्यमगती गोलंदाजांना ते खेळवणार हे निश्चित आहे. बेन स्टोक्सऐवजी मोईन अली संघात येणार. तसेच डेव्हिड मालनला वगळून ओलिवर पोपचा अंतिम अकरामध्ये समावेश होईल. अर्थात मोईन अली व अदिल रशीद या दोन फिरकी गोलंदाजांना खेळवायचे की नाही याबाबत त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.