
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
टीम इंडिया आणि इंग्लंड संघातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना क्रिकेटची पंढरी लॉर्डसच्या मैदानावर रंगणार आहे. इंग्लंडमधील या मैदानाचा खास इतिहास आहे आणि या मैदानावर एकदा तरी खेळण्याची संधी मिळावी असे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. क्रिकेटच्या या पंढरीवर अनेक विक्रम रचले गेले आहे. यातील काही विक्रम अद्यापही कायम आहेत. पाहूया काय आणि कोणी केलेत हे आहेत…
विनू मंकड (हिंदुस्थान) –

क्रिकेटच्या या पंढरीवर अर्धशतक, शतक यासह पाच बळी घेण्याचा भीम पराक्रम करणारे विनू मंकड हे एकमेव अष्टपैलू खेळाडू आहेत. मंकड यांनी टीम इंडियाच्या १९५२ च्या दौऱ्यात ही कामगिरी केली होती. यात त्यांनी टीम इंडियाकडून खेळताना पहिल्या डावात ७२ धावा केल्या होत्या, तर इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात गोलंदाजी करताना १९६ धावांत ५ बळी घेतले. त्यानंतर दुसऱ्या डावात मंकड यांनी १८४ धावा ठोकल्या होत्या. त्यांचा हा विक्रम आजही अबाधीत आहे.
ग्राहम गूच (इंग्लंड) –

लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर २००० धावा गाठणारे इंग्लंडचे ग्राहम गूच हे पहिले फलंदाज आहेत. लॉर्डसवर खेळलेल्या २१ सामन्यात त्यांनी ६ शतक आणि ५ अर्धशतकांच्या जोरावर हा पल्ला गाठला. गूच यांची ३३३ ही या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या आहे.
फक्त तिघांच्या २५० पेक्षा जास्त धावा –

या मैदानावर आतापर्यंत फक्त तीनच फलंदाजांना २५० पेक्षा जास्त धावांची खेळी करता आलेली आहे. यावरून येथे फलंदाजी करणे किती कठीण आहे हे कळते.
> इंग्लंडचे ग्राहम गूच यांनी १९९० ला टीम इंडियाविरुद्घ खेळताना ४८५ चेंडूत ३३३ धावा केल्या.
> दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ याने २००३ ला इंग्लंडविरुद्घ खेळताना ३७० चेंडूत २५९ धावा ठोकल्या.
> ऑस्ट्रेलियाचा जगविख्यात फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी १९३० ला इंग्लंडविरुद्ध खेळताना ३७६ चेंडूत २५४ धावांची खेळी केली होती.
बॉल विलिस (इंग्लंड) –

इंग्लंडचे दिग्गज खेळाडू बॉब विलिस यांनी १९८२ ला टीम इंडियाविरुद्ध खेळताना १०१ धावांत ६ बळी घेतले होते. कसोटी सामन्याच्या एका डावात कोणत्याही संघाच्या कर्णधाराने लॉर्डसवर केलेली ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
दोनदा ८ विकेट घेणारे दोघेच

या मैदानावर आतापर्यंत दोन वेळा एका डावात ८ बळी घेण्याची कामगिरी फक्त दोन गोलंदाजांना करता आलेली आहे. इंग्लंडच्या इयान बोथम यांनी सर्वात आधी १९७८ ला पाकिस्तानविरुद्ध ३४ धावांत ८ बळी घेतले होते, त्यानंतर १९८४ ला वेस्ट इंडिजविरुद्ध १०३ धावांत ८ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज बॉब मॅसी यानेही इंग्लंडविरुद्ध १९७२ मध्ये खेळलेल्या कसोटीत आधी ८४ धावांत ८ बळी आणि नंतर ५३ धावांत ८ बळी घेण्याची कामगिरी केली.
मॅट प्रायर (इंग्लंड) –

लॉर्डसवर एकाच कसोटीत ७ फलंदाजांना पवेलियनमध्ये पाठवण्याची आणि शतक झळकावण्याची कामगिरी करणारा इंग्लंडचा माजी खेळाडू मॅट प्रायर हा एकमेव खेळाडू आहे. अशी कामगिरी प्रायरने दोन वेळा केली आहे. सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१२ मध्ये झालेल्या कसोटीत १०० धावा (पहिल्या डावात ९७ आणि दुसऱ्या डावात ३ धावा) आणि ८ विकेट (६ कॅच आणि २ स्टंपिंग) करण्याची कामगिरी केली. त्यानंतर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटीत १०२ धावा (पहिल्या डावात ८६ आणि दुसऱ्या डावात १६ धावा) आणि ७ विकेट (सर्व कॅच) घेतल्या होत्या.

























































