
राज्य सरकारने केएससी नवनगरच्या (कर्नाळा-साई-चिरनेर) नावाने तिसऱ्या मुंबईची घोषणा केल्यानंतर उरण, पनवेल व पेण तालुक्यातील १२४ महसुली गावांमध्ये भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर तिसऱ्या मुंबईच्या सर्वेक्षणासाठी पट्टेही आखण्यात आले असून उरणच्या खोपटा गावात ग्रामस्थांनी हे पट्टे पेटवून अनोखे आंदोल न छेडले. दरम्यान सर्वेक्षणाकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांनाही गावकऱ्यांनी हुसकावून लावले असून तिसऱ्या मुंबईविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित तिसऱ्या मुंबईसाठी साडेबावीस टक्के योजनेंतर्गत भूसंपादनास शेतकऱ्यांनी याआधीच विरोध दर्शवला आहे. २५ हजार शेतकऱ्यांनी हरकतीही नोंदवल्या आहेत. सरकारविरोधात संघर्ष सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी २०१३ च्या नवीन भूसंपादन कायद्यांतर्गत जमीन संपादित करावी. तसेच प्रथम घरे नियमित करावीत अशी मागणी केली आहे. सरकार मात्र बड्या भांडवलदारांचे तारणहार म्हणून काम करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
- केएससी नवघर संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन पुकारण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या, हरकती तसेच त्यांच्या भावनांचा विचार न करता सरकारी कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.
- संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चिरनेर, सारडे गावात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले होते. शुक्रवारी खोपटा गावात सर्वेक्षणासाठी आलेल्या कामगारांनाही हाकलून लावण्यात आले.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेंद्र पाटील आदींनी भाग घेतला. रंगाने आखलेल्या पट्ट्यांना संतप्त शेतकऱ्यांनी पेटवून देत शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला. हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिला आहे.

























































