बिया द्या, रोपटं घ्या! पर्यावरण संवर्धनासाठी ‘देऊळ बंद’मधील बालकलाकार सरसावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ‘देऊळ बंद’ सिनेमातील बालकलाकार आर्या घारे हिने पुढाकार घेतला आहे. ‘चला डोंगर हिरवेगार करू’ या उपक्रमाअंतर्गत ‘तुम्ही मला झाडांच्या बिया पाठवा, मी तुम्हाला रोपटं पाठवते’ अशी साद 13 वर्षीय आर्याने पर्यावरणप्रेमींना घातली आहे. तिच्या या उपक्रमाला राज्यभरातून पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आजवर हजारो बिया तिच्याकडे पोस्टाद्वारे जमा झाल्या आहेत.

पुण्यात राहणाऱया आर्याने ‘देऊळ बंद’, ‘अबक’, ‘बंदिशाळा’, ‘पोस्टर गर्ल’ आदी सिनेमांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच पर्यावरणावरही तिचे भरपूर प्रेम आहे. पर्यावरणाच्या आवडीविषयी आर्या सांगते, ‘‘आजी आणि आई यांच्यामुळे मला लहानपणापासूनच पर्यावरणाविषयी आवड निर्माण झाली. त्यांच्यासोबत मी अनेक झाडं लावली. पुढे मैत्रिणींसोबत सायकलवरून फिरताना रस्त्याच्या कडेला पडलेल्या झाडांच्या बिया गोळा करण्याचा मला छंद लागला. या बिया रुजवून सोसायटीच्या आवारात त्यापासून रोपटी तयार केली.’’ पुढे ती म्हणाली, ‘‘गतवर्षी लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे शक्य नव्हते. त्यामुळे हा उपक्रम थांबतोय की काय असे वाटत होते. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून हा उपक्रम आणखी मोठय़ा प्रमाणात राबवण्याचे मी ठरवले.’’

चला, डोंगर हिरवेगार करू!

आंब्याच्या कोया, जांभूळ, सीताफळ, रामफळाच्या बिया पाठवण्याचे आवाहन आर्याने केले आहे. आतापर्यंत पोस्ट आणि कुरियरच्या माध्यमातून तिच्याकडे हजारो बिया जमा झाल्या आहेत. तीन हजारांहून अधिक फोन काॅल्स आले आहेत. जमा झालेल्या बियांचे रोपटय़ात रुपांतर करण्यासाठी आर्याने भावंडांच्या मदतीने पारनेर येथे छोटी नर्सरी तयार केली आहे. रोपटय़ांची व्यवस्थित वाढ झाल्यावर ती इच्छुकांना पाठवली जातात. तुमच्याकडे रोपटं लावायला जागा नसेल तर आपण सगळे मिळून ही रोपं डोंगरावर लावू आणि डोंगर हिरवेगार करू, असे आर्याने सांगितले.

आजचं बियाणं; उद्याचा ऑक्सिजन

कोरोनामुळे निसर्गाचे महत्त्व लोकांना आता पटू लागलंय. सद्यपरिस्थितीत ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ माणसावर आली आहे. आजचं बियाणं हे उद्याचा ऑक्सिजन आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करा, शक्य तितकी झाडं लावा, असे आवाहन आर्याने केले आहे.