पर्यावरणाच्या अभ्यासासाठी युनिसेफबरोबर करार, आदित्य ठाकरे यांचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय जीवनातच पर्यावरणाबाबत जागरुक करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्वक पर्यावरणविषयक शालेय अभ्यासक्रम तयार करण्यासाठी राज्याचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व युनिसेफमध्ये आज करार करण्यात आला. हा अभ्यासक्रम 5 जून 2021 पर्यंत पूर्ण होईल.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पर्यावरणीय गोलमेज परिषद आयोजित केली होती. या बैठकीला राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, युनिसेफ मुंबईच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंबंधी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्यासोबत विविध घटकांचे एकत्रीकरण करण्यासंदर्भातील काम या कराराच्या माध्यमातून केले जाणार आहे.

मुलांना शालेय जीवनातच पर्यावरण व वातावरणीय बदलांबद्दल सजगता निर्माण करण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या आत कोंडण्यापेक्षा त्यांना पर्यावरण व वातावरणीय बदलासंदर्भातील शिक्षण वर्गाबाहेर व प्रात्यक्षिकाद्वारे द्यावे 

– आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री