केंद्र सरकारचा नोकरदार वर्गाला जोरदार धक्का, पीएफच्या व्याजदरात पुन्हा कपात

1324

केंद्र सरकारने नोकरदार वर्गाला जोरदार धक्का दिला आहे. केंद्राने भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या व्याजदरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने पीएफचे व्याजदर 0.15 टक्क्यांनी घटवले आहेत. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो लोकांना फटका बसणार आहे.

केंद्र सरकारने पीएफवरील व्याजदर पुन्हा घटविण्याचा निर्णय घेतला. आता पीएफवरील व्याजदर 8.65 टक्क्यांवरुन 8.50 टक्क्यांवर आले आहेत. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी गुरुवारी ही माहिती दिली. याआधीही मोदी सरकार ईपीएफमध्ये कपात करेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. गुरूवारी ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. याच बोर्डकडून पीएफच्या व्याजाची टक्केवारी निश्चित केली जाते.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, आता नोकरदार वर्गाला 2019-20 मध्ये जमा झालेल्या पीएफवर 0.15 टक्के कमी व्याज मिळणार आहे. 2018-19 मध्ये हा व्याजदर 8.65 टक्के होता. आता हा व्याजदर 8.50 टक्क्यांवर आला आहे. ईपीएफओच्या विश्वस्ताच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, आर्थिक पातळीवर फारसी चांगली कामगिरी होत नसल्याने ईपीएफओच्या गुंतवणुकीला फटका बसला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. ईपीएफओने बाजारामध्ये जवळपास 18 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यातील जवळपास 4500 कोटी रुपयांची गुंतवणूक डीएचएफएल आणि आयएल अँड एफएसमध्ये आहे.

सध्या बाजारामध्ये डीएचएफएल आणि आयएल अँड एफएसचे वाईट दिवस सुरू आहेत. त्यामुळे केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 6 कोटी खातेधारकांच्या पीएफवरील व्याजदरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या ईपीएफओकडे जवळपास 12 कोटी कर्मचाऱ्यांचे पीएफ जमा असले तरी यातील फक्त 6 कोटी लोकांची खाते अॅक्टिव्ह आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या