गोवा महामार्गावर हमरापूर येथे इर्टिगा गाडी जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

मुंबई गोवा महामार्गावर एक इर्टिगा गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी नाही.

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिगा क्रमांक MH 46 BA 5471 या गाडीला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. पेण जवळील हमरापूर येथील पुलावर गाडी आली असता ही आग लागली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. अचानक लागलेल्या आगीमुळे गाडी चालक शंकर जाधव हे घाबरून गाडीतून बाहेर पडले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

सामाजिक कार्यकर्ते व अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकुर हे जाधव यांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने कल्पेश ठाकुर यांनी त्वरीत पेण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. गाडीला आग लागल्याचे वृत्त कळताच पेण नगरपरिषदेची अग्निशमन दलाची गाडी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या प्रयत्नाने आग वेळीच आटोक्यात आली.

वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमुळे काही काळ महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.