
सामना ऑनलाईन | ब्रुसेल्स
आपले सर्च इंजिन मजबूत करण्यासाठी गुगलने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचा बेकायदा वापर केल्याचा आरोप युरोपिअन युनियनने केला आहे. गुगलच्या या गुन्ह्याबद्दल युरोपिअन युनियनचे कमिशनर मारग्रेथ वेस्टेजर यांनी गुगलला ४.३४ अब्ज युरो म्हणजेच ३४ हजार ३०८ कोटी रुपयांचा प्रचंड दंड ठोठावला आहे.
युरोपच्या अँटीट्रस्ट कायद्याचा भंग गुगलने केला असल्याचे वेस्टेजर यांनी म्हटले आहे. गुगलने ९० दिवसांत अँड्रॉइडचा वापर न थांबवल्यास त्यांना अल्फाबेटच्या उत्पन्नाच्या ५ टक्के दंड प्रतिदिनी भरावा लागेल असेही युरोपिअन युनियनने स्पष्ट केले आहे.
यापूर्वीही युरोपिअन युनियनने गुगलला २.४ अब्ज युरो इतका दंड ठोठावला होता. मात्र आताच्या मोठ्या दंडाविरुद्ध आपण अपील करणार असल्याचे गूगलचे प्रवक्ता अल वर्नी यांनी सांगितले. ग्राहकांना जादा पर्याय मिळावेत म्हणून अँड्रॉइड बनविण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञानातील वेगवान सुधारणा आणि उत्तम सुविधांचा खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही अँड्रॉइडचा वापर करीत आहोत असेही वर्नी यांनी स्पष्ट केले.
व्यापार युद्ध भडकणार
अमेरिकन राट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपातून अमेरिकेत येणाऱ्या स्टील आणि ऐल्युमिनियमवर मोठा आयात कर लावल्याने युरोपात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यातच अमेरिकन सिलिकॉन व्हॅलीचा इंटरनेट सर्चवरील वाढता प्रभावही युरोपला अस्वस्थ करून सोडणारा आहे. त्यातूनच गूगलवर मोठा दंड लादण्याची कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत. या घडामोडींमुळे अमेरिका आणि युरोप खंडात नवे व्यापार युद्ध ( ट्रेड वॉर ) भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

























































