युक्रेनला सुरक्षा हमी मिळायला हवी, सीमा बदल स्वीकारार्ह नाहीत; ट्रम्प-पुतिन भेटीनंतर युरोपियन युनियन झेलेन्स्कींच्या समर्थनार्थ उतरले

अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात 15 ऑगस्ट रोजी झालेल्या भेटीनंतर युरोपियन युनियनने (EU) युक्रेनला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. युरोपियन युनियनच्या नेत्यांनी युक्रेनला ठोस सुरक्षा हमी देण्याची मागणी केली असून, युक्रेनच्या सीमांमध्ये जबरदस्तीने बदल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर फ्रेड्रिक मर्ज, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर, फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी संयुक्त निवेदनात ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांचे स्वागत केले. तसेच त्यांनी युक्रेन आणि युरोपच्या सुरक्षेसाठी त्रिपक्षीय शिखर परिषदेची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले.

युरोपियन युनियनच्या नेत्यांनी युक्रेनला संप्रभुता आणि प्रादेशिक अखंडतेसाठी सुरक्षा हमी मिळावी, यावर जोर दिला. युक्रेनच्या सशस्त्र दलांवर किंवा तिसऱ्या देशांशी सहकार्यावर कोणतेही निर्बंध लादले जाऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. युरोपियन युनियनने युक्रेनला समर्थन आणि रशियावर दबाव कायम ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.