
गतविजेत्या पोर्तुगाल फुटबॉल संघाचे युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील आव्हान रविवारी मध्यरात्री संपुष्टात आले. फिफा रँकिंगमध्ये नंबर वन स्थानावर असलेल्या बेल्जियमने ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला 1-0 असे पराभूत केले आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. थोरगन हझार्ड याने 42व्या मिनिटाला शानदार गोल करीत बेल्जियमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता अंतिम आठ फेरीच्या लढतीत बेल्जियमसमोर इटलीचे आव्हान असणार आहे.
नेत्रदीपक गोल
गतविजेता पोर्तुगाल व नंबर वन बेल्जियम यांच्यामधील लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र पूर्वार्धात दोन्ही संघांतील खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पहिले सत्र संपायला तीन मिनिटे बाकी असताना बेल्जियमच्या थोरगन हझार्ड याने आपल्या अंगभूत काैशल्याचा अद्भुत नजराणा पेश केला. त्याने उजव्या पायाने फुटबॉलला मारलेली कीक पोर्तुगालचा गोलकिपर रुई पॅट्रिसियो याला भेदत थेट गोलजाळ्यात विसावली. थोरगन हझार्डच्या या गोलने तमाम फुटबॉलप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
वर्चस्व… तरीही पराभव
पोर्तुगालने उत्तरार्धात बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. या संघातील फुटबॉलपटूंनी वारंवार बेल्जियमच्या गोलपोस्टवर आक्रमण केले. काही वेळा गोलपोस्टला फुटबॉल लागला, तर काही वेळा वरून फुटबॉल गेला. पोर्तुगालला या वेळी नशिबाची साथ लाभली नाही. फुटबॉलवरील ताबा 56 टक्के त्यांच्याकडे होता. या संघातील खेळाडूंनी 24 वेळा फुटबॉल टार्गेटकडे मारला. बेल्जिमयच्या फुटबॉलपटूंनी मात्र सहा वेळाच फुटबॉल टार्गेटकडे मारला. पोर्तुगालच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली खरी पण गोल करण्यात त्यांना अपयश आले.
रोनाल्डोची अखेरची युरो स्पर्धा?
दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याचे सध्याचे वय 36 आहे. त्यामुळे आता पुढील युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये (2024) त्याच्या सहभागाची शक्यता कमीच आहे. पण कतार येथे 2022 सालामध्ये होणाऱया फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तो पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करू शकेल. अर्थात दस्तुरखुद्द ख्रिस्तियानो रोनाल्डो याने पराभवानंतर कोणतीही शक्यता व्यक्त केलेली नाही. गोल केल्यानंतर सेलिब्रेशन करताना हझार्ड बंधू एडन व थोरगन.
बेल्जियम-पोर्तुगाल लढतीची आकडेवारी
- बेल्जियम पोर्तुगाल
- गोल 1 0
- शॉट 6 24
- शॉट ऑन टार्गेट 1 5
- बॉलवरील ताबा 44 56
- ऑफसाईड 1 3
- कॉर्नर्स 0 3
- यलो कार्ड 2 3
- रेड कार्ड 0 0


























































