
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती विटंबना प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत आले तरी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याने राहुरीत संतापाची लाट उसळली आहे. निषेधाचा अनोखा मार्ग अवलंबत शिवप्रेमींनी यंदाची शिवजयंती थेट राहुरी पोलीस ठाण्यासमोर साजरी करून प्रशासनाला जाब विचारला.
गेल्या वर्षी 26 मार्च 2025 रोजी घडलेल्या विटंबनेच्या घटनेनंतर तालुका बंद, निषेध मोर्चे आणि आंदोलनांची मालिका झाली. त्यावेळी आरोपींना त्वरित अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, वर्ष उलटत आले तरी तपासात ठोस प्रगती नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनावर टीका करत, ‘आश्वासनांची पोकळ फुगेबाजी थांबवा, आरोपींना तत्काळ अटक झाली नाही तर शिवप्रेमी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत’, असा इशारा दिला. आंदोलनादरम्यान विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘राहुरी शांतताप्रिय असली तरी संयमाचा अंत पाहू नका’, असा इशारा दिला.
याप्रसंगी तहसीलदार डॉ. अमित पवार आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वर्षा लांबे, रोहिणी शेळके, राणी घाडगे, राणी तनपुरे, विद्या अरगडे, वर्षा सरमाने, अपर्णा धमाळ, रूपाली दळे, भाग्यश्री बोरुडे, वैशाली शेळके, राजूभाऊ शेटे, बाळासाहेब उंडे, विराज धसाळ, नंदूशेठ भट्टड, अनिल कासार, किरण कडू, साहेबराव म्हसे, विलास तरवडे, नितीन कल्हापुरे, ज्ञानेश्वर गाडे, कांतीलाल जगधने उपस्थित होते.
26 मार्चला ‘वर्षश्राद्ध’ आंदोलन
26 मार्च 2026 रोजी विटंबनेच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या दिवसापर्यंत आरोपींवर ठोस कारवाई न झाल्यास राहुरी पोलीस ठाण्यासमोर शासनाचे ‘वर्षश्राद्ध’ घालून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे.




























































