कुर्ला विधानसभेत तांत्रिक बिघाडामुळे 29 ईव्हीएम बंद पडल्या

618
evm-f

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमधील (ईव्हीएम) बिघाडानेच आज कुर्ला विधानसभेतील मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सुरुवात करतानाच एक-दोन नव्हे तर तब्बल 17 मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या मशीन तत्काळ बदलून मतदानाला सुरुवात झाली खरी, पण दिवसभर ईव्हीएमधील बिघाडाचे सत्र सुरू राहिल्याने 12 मशीन बदलाव्या लागल्या. या प्रक्रियेला सुमारे अर्धा-पाऊण तास लागत असल्याने मतदारांना बराच वेळ रांगेत ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे अनेकजण संताप व्यक्त करत होते.

कुर्ला विधानसभेत दोन लाख 73 हजार मतदार असून त्यांना सहजपणे मतदान करता यावे म्हणून कुर्ला पूर्व, पश्चिम, चुनाभट्टी, टिळकनगर आणि चेंबूरमध्ये 287 बुथ उभारले होते. मतदान सुरळीत पार पडावे म्हणून निवडणूक आयोगाने चोख तयारी केली होती, पण वारंवार ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने कर्मचाऱयांबरोबरच मतदारही त्रस्त झाले होते. मतदानाच्या सुरुवातीलाच 17 मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्याने त्या ठिकाणी दुसऱया मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे सदर बुथवर जवळपास अर्धातास उशिराने मतदानाला सुरुवात झाली त्यांनतर साडेआठच्या सुमारास गणेशबाग पालिका शाळेतील बुथ क्रमांक 233 मधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. तर शांताराम पंत वालावलकर शाळेतील एकच ईव्हीएम दोन वेळा बंद पडली. हीच परिस्थिती अन्य मतदान केंद्रांवर असल्याने गोंधळ उडाला होता.

म्हणे आर्द्रता वाढल्याने ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड
वारंवार बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत विचारले असता हवामानात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याचे सह निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना घोलप यांनी सांगितले. तसेच मशीनमधील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी संबंधित तज्ञ अभियंते तैनात केल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारांसाठी पाणी, व्हीलचेअर आणि मदतीसाठी स्वयंसेवक
पावसाची रिपरिप थांबल्यानंतर दिवसभर कडक ऊन पडले होते. त्याची दखल घेल निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदारांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केली होती. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच व्हीलचेअर मतदान कक्षापर्यंत ढकलत घेऊन जाणे, मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळकरी मुले स्वयंसेवक म्हणून तैनात केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या