नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ, महिलांच्या छळवणुकी संदर्भात आधीच्या तक्रारींच्या चौकशीचे निर्देश

1111
narendra-mehta-1

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान महिला अत्याचारांच्या घटनांवरून सरकारला लक्ष करणारी भाजप चांगलीच अडचणीत सापडली आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर महिलांचा छळ केल्याचे आरोप होत आहेत. या संदर्भात विधान परिषदेत महिला सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात सरकार काय कारवाई करणार असे सवाल यावेळी करण्यात आले. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे. तसेच नरेंद्र मेहता यांच्याविरोधातील आधीच्या तक्रारींचे काय झालं हे तपासण्याचे निर्देश सभापतींकडून देण्यात आले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत महिला सदस्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर स्पष्ट शब्दात उत्तर दिले. ‘मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. एका राजकीय पक्षाचा माजी आमदार यापद्धतीने महिलांना वागवतो, असे स्टेटमेंट महिला नगरसेविकेने दिले आहे. त्याच्या बाबतीत मी तिथले जे अधिकारी आहेत त्यांच्याशी रात्री बोललो. त्यानंतर माजी आमदाराचं स्टेटमेंट देखील घेण्यात आलं. आजपर्यंत महिलेने तक्रार दिलेली नाही. महिलेने फक्त या तक्रारीसंदर्भात माहिती दिली. बुधवारी मीरा-भाईंदरची निवडणूक झाल्यानंतर तक्रार नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे’, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

त्यानंतर विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी पीडित महिलेशी संवाद साधला असल्याची माहिती सभागृहाला दिली. ‘गृहमंत्र्यांनी जी माहिती सभागृहात दिली आहे त्यात तथ्य आहे की त्यांनी अद्याप तक्रार नोंदवलेली नाही. परंतु, सन्माननीय पीडित महिलेने मला सांगितले आहे की त्यांनी जुलै 2019 मध्ये तक्रार दिली होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. म्हणून मी सभापतीच्या पदावरून गृहविभागाला निर्देश देते की, आधीच्या तक्रारीचं काय झालं? याची आपण चौकशी करावी आणि 2016 मध्ये सुद्धा सन्मानीय महिलेने नोटरी करून तक्रार केली आहे की हा मनुष्य मला दडपण आणतो आहे, धमक्या देत आहे. तर त्या नोटरीविषयक तक्रारीचे काय झालं तेही आपण बघावं’, असे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता महिलांची छळवणूक करत आहेत. त्यांच्याकडून मला व माझ्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचा आरोप भाजपच्या विद्यमान नगरसेविका नीला सोन्स यांनी एका व्हिडीओद्वारे मंगळवारी केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या