हिमालय पूल दुर्घटना : पालिकेच्या सेवानिवृत्त मुख्य अभियंत्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिमालय पादचारी पूल दुर्घटनाप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी सोमवारी चौथी अटक केली. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी पालिकेच्या पूल विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता शीतलप्रसाद कोरी (60) यांना अटक केली आहे. कोरी यांना आज कोर्टात हजर केले असता त्यांना 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

14 मार्च रोजी हिमालय पादचारी पूल कोसळला होता. त्यात सात जणांचा नाहक जीव गेला होता, तर 30 पादचारी गंभीर जखमी झाले होते. शीतलप्रसाद कोरी हे सप्टेंबर 2014 ते जुलै 2018 या कालावधीत पूल विभागाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. ते कार्यरत असताना हिमालय पादचारी पुलाची डागडुजी तसेच ऑडिट करण्यात आले होते.

कामात हलगर्जीपणा

कोरी यांनी दुरुस्ती केलेल्या पुलांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणे, त्यांच्या विभागात काम करणाऱया अभियंत्यांच्या कामाचा आवश्यक आढावा घेणे. ऑडिट रिपोर्टवर शेरा देणे, दुरुस्त केलेल्या कामाची पाहणी करणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते, परंतु कोरी यांनी त्यांचे काम चोखपणे बजावले नाही. त्यांनी पूल विभागात कार्यरत असताना कामात हलगर्जीपणा केला. दुरुस्त केलेल्या पुलांची पाहणी केली नाही, ऑडिट रिपोर्ट तसेच आवश्यक कामांची देखरेख करणे गरजेचे असताना त्यांनी ते काम केले नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे कोरी यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आणखी तपास करणे गरजेचे असून त्यासाठी कोरी यांची पोलीस कोठडी पाहिजे असल्याची मागणी पोलिसांनी कोर्टात केली होती. त्यानुसार कोर्टाने कोरी यांना 10 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याआधी पोलिसांनी याच प्रकरणात पूल विभागाचे सहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळते, कार्यकारी अभियंता अनिल पाटिल आणि हिमालय पुलाचे ऑडिट करणारे नीरजकुमार देसाई यांना अटक करण्यात आली होती.