
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आता अर्जुन खोतकर यांचे स्विय सहाय्यक म्हणून किशोर पाटील यांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली नाही हे स्पष्ट केले आहे. पण, तत्पूर्वीच किशोर पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खोतकर यांनी किशोर पाटील आपले स्वीय सहाय्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता खरे कोण आणि खोटे कोण बोलत आहे, असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.
मिंधे गटाचे आमदार आणि विधिमंडळ अंदाज समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचा स्वीय सहाय्यक किशोर पाटील याचे वसुलीकांड शिवसेनेने उघडकीस आणल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये 1 कोटी 84 लाख रुपयांची रक्कम सापडली. ही खोली किशोर पाटील याच्या नावे आरक्षित असल्याची नोंद आहे. धुळे विश्रामगृहातील वसुलीकांडाचे हे प्रकरण उघडकीस येताच किशोर पाटील यांना सभापती राम शिंदे यांनी निलंबित करून चौकशी सुरू करण्यात आल्याचे यापूर्वी सांगितले होते. याकडे माजी आमदार गोटे यांनी लक्ष वेधत खरं कोण बोलतंय, असा सवाल केला आहे.