
हिंदुस्थानच्या राजकारणात तब्बल पाच दशके आपला वेगळा ठसा उमटविणारे धुरंधर नेते, माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. 10 ऑगस्टपासून दिल्लीतील लष्कराच्या रिसर्च ऍण्ड रेफरल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळच्या सुमारास प्रणवबाबू यांची प्राणज्योत मालवली. प्रणवबाबू यांच्या निधनाने सर्व स्तरांतून तीव्र दुःख व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
प्रणव मुखर्जी यांचे पुत्र खासदार अभिजित मुखर्जी यांनी ट्विटरद्वारे निधनाची माहिती सर्वप्रथम दिली. 10 ऑगस्टला प्रणव मुखर्जी हे आपल्या निवासस्थानी बाथरूममध्ये कोसळले होते. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत कोविड-19 पॉझिटव्ह असल्याचे निदान झाले. याबाबत प्रणवदा यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती. तसेच, वैद्यकीय तपासणीत त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर शस्त्रकिया करण्यात आली. 13 ऑगस्टपासून कोमात होते. आज सकाळी रुग्णालय प्रशासनाने प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. सायंकाळी प्रणवबाबू यांची प्राणज्योत मालवली.
प्रणव मुखर्जी हे पाच दशके काँग्रेसचे नेते होते. संकटमोचक, अजातशत्रू नेते होते. ‘प्रणवबाबू’, ‘प्रणवदा’ या नावाने त्यांची ओळख होती. सर्व पक्षांत मित्र असलेले प्रणव मुखर्जी 2012 ते 2017 या काळात हिंदुस्थानचे राष्ट्रपती होते.
पाच दशकांचे साक्षीदार… संकटमोचक नेते !
प्रणवबाबू, प्रणवदा या नाकाने सुपरिचित असलेले प्रणव मुखर्जी हे हिंदुस्थानी राजकारणाचे पाच दशकांचे साक्षीदार होते. संसदीय राजकारणात काँग्रेस पक्षाचे ते संकटमोचक नेते होते. प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यात मिराती या गावात झाला. त्यांचे वडील कामदा किंकार मुखर्जी हे काँग्रेस नेते होते. 1952 ते 1964 पर्यंत ते पश्चिम बंगाल विधानपरिषदेचे सदस्य होते. प्रणव मुखर्जी यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र आणि इतिहासात एम.ए.केले.ते पोस्टात सिनियर क्लर्क होते. त्यानंतर प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. काही काळ पत्रकारिताही केली.
इंदिरा गांधींचे विश्वासू
1969 ची मिदनापुर लोकसभेची पोटनिवडणूक प्रणवदा यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ठरली. मिदनापुर येथून व्ही.के. कृष्णा मेनन काँग्रेस उमेदवार होते. प्रणवदा यांच्यावर नियोजनाची जबाबदारी होती. सिद्धार्थ शंकर रे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. रे यांनी प्रणवदा यांची ओळख इंदिरा गांधी यांच्याशी करून दिली. प्रणवदा यांची बुद्धिमत्ता, राजकीय चातुर्य पाहून इंदिरा गांधी यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि प्रणवदा 35 व्या कर्षी खासदार झाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राजकारणात पाच दशके मागे वळून पाहिले नाही. 1969, 1975, 1981, 1993, 1999 असे पाचवेळा राज्यसभा आणि 2004 आणि 2009 दोनवेळा प्रणवदा लोकसभा खासदार होते.
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘मातोश्री’वर आले होते
प्रणवदा दीर्घकाळ काँग्रेस नेते होते पण सर्वपक्षांमध्ये त्यांचा स्नेह होता. 2012ला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणव मुखर्जी ’मातोश्री’ येथे हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही त्यांच्या बरोबर होते. शिवसेनाप्रमुखांनी प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर प्रणवदा भरघोस मतांनी देशाचे 13वे राष्ट्रपती बनले होते.
अर्थमंत्री असताना मनमोहन सिंगांना रिझर्क बँकेचे गव्हर्नर केले
1973 ला इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी पहिल्यांदा उपमंत्री झाले. 1974 ला अर्थ राज्यमंत्री झाले. आणीबाणीत ते इंदिरा गांधींचे विश्वासू साथीदार होते. जनता पक्षाचे सरकार दोन वर्षात गेले आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. प्रणव मुखर्जी यांच्याकडे 1980ते 1982 या काळात वाणिज्य खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. 1982ला ते देशाचे अर्थमंत्री झाले. 1984पर्यंत अर्थमंत्री होते. विशेष म्हणजे डॉ. मनमोहनसिंग यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नपदी नियुक्तीच्या पत्राकर प्रणवदा यांची अर्थमंत्री म्हणून स्वाक्षरी होती.
एका युगाचा अंत झाला
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावलं. त्यांचे निधन म्हणजे एका युगाचा अंत आहे. प्रणव मुखर्जी यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सर्व देशवासियांच्या प्रती मी दुःख व्यक्त करतो. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्कामध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम होता. पाच दशकांच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात अनेक उच्च पदांवर असूनही ते नेहमीच जमिनीशी जोडलेले होते. त्यांच्या सभ्य आणि मनमिळावू स्वभाकामुळे ते राजकीय क्षेत्रात लोकप्रिय होते. प्रणवदा यांनी देशाची सेवा एका संतासारखी केली. –रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
प्रणवदा कायम स्मरणात राहतील
भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने संपूर्ण राष्ट्र शोकाकूल आहे. देशाच्या विकासमार्गावर त्यांनी वेगळी छाप सोडली होती. एक विद्वान, एक राजकारणी म्हणून समाजातील सर्व घटकांनी त्यांचे कौतुक केले. राष्ट्रपती असताना त्यांनी राष्ट्रपती भवन हे शिक्षण, संस्कृती, संशोधन, विज्ञान आणि साहित्याचे केंद्र बनवले होते. त्यांचे मार्गदर्शन, पाठिंबा आणि आशीर्वाद आम्हाला नेहमी लाभला. देशहितासाठी त्यांनी घेतलेले महत्वाचे धोरणात्मक निर्णय कायम स्मरणात राहतील. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
राजकारणातील पितामह भीष्म गमावले
स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुस्थानच्या राजकारणावर अंगभूत बुद्धिमत्ता, कार्यकुशलता, संघटन कौशल्य, प्रशासकीय व सांसदीय कार्य अनुभव आणि राजनैतिक द्रष्टेपणाची अमिट छाप सोडणाऱ्य़ा निवडक राजकारण्यांमध्ये प्रणब मुखर्जी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, सभागृह नेते आणि राष्ट्रपती अशा विविध जबाबदाऱ्य़ा समर्थपणे पार पाडताना त्या त्या पदांची ऊंची वाढविली. जवळ जवळ चार दशके सातत्याने संसदेचे सदस्य असलेल्या प्रणब मुखर्जी यांनी देशातील सांसदीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी असाधारण असे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे देशाने सांसदीय राजकारणातील भीष्म पितामह गमावले आहेत.– भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
देश महान मुत्सद्दी नेत्यास मुकला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आदरांजली
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.
गेली किमान 60 वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचाच विचार करून त्यांनी आपली पावले टाकली. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली, पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली. त्यांचे वाचन अफाट होते. त्यांची निरीक्षणशक्ती अचाट होती आणि ते कमालीचे हजरजबाबी होते. काँग्रेस पक्ष संकटात असताना अनेकदा वादळातील नौका किनाऱ्य़ाला लावण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. उत्तम पंतप्रधान होण्याची क्षमता त्यांच्यात होती, पण ते देशाचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत. प्रणवबाबू आपल्यातून निघून गेले. त्यांचा प्रभाव देशाच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ राहील. महाराष्ट्राच्या जनतेतर्फे मी त्यांना आदरांजली वाहत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.





























































