
डॉ. अनिल कुलकर्णी
आपल्याकडे होम स्कूल काही ठिकाणी रुजलं, पण फोफावलं नाही. काही शाळा, कुटुंब शिक्षक, पालक आजही परीक्षा नसल्या तरी तयारी परीक्षेपेक्षा जास्त करून घेतात. प्रश्न आहे जिथे शिक्षण प्रक्रियाच घडत नाही तिथले सगळे विद्यार्थी सारखे नसतात. सगळे शिक्षक, सगळय़ा शाळा यांच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. परीक्षा हा शैक्षणिक प्रक्रियेचा एक भाग आहे याचा विसर पडता कामा नये. परीक्षाबंदीचं ग्रहण संपून पुन्हा परीक्षा म्हणजे परीक्षेची परीक्षा ठरणार आहे.
काही राज्यांमध्ये सरकारी शाळांत आठवी पास मुलांना काही वाक्येसुद्धा नीट लिहिता येत नव्हती असे आढळून आले. काळजी करण्यासारखे हे आहे की, नववीत अनुत्तीर्णांचे प्रमाण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल व दिल्लीत (NCR) जास्त होते. विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण युरोपकडून आले, पण आपल्याकडील भयानक दारिद्रय़, प्रचंड लोकसंख्या, अप्रशिक्षित शिक्षक (सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व रचनावाद याला न्याय न देणारे) अशिक्षित पालक, भौतिक सुविधेची कमतरता यामुळे काही ठिकाणी, आव्हानात्मक परिस्थितीमुळे प्रश्न निर्माण झाले. गोंडस तत्त्वज्ञान व आदर्श सगळीकडेच रुजतात, रुचतात असं नाही. परीक्षा पूर्वीही होत्याच. त्यात त्रुटी होत्या, पण चांगली व्यक्तिमत्त्वं घडलीच.
सध्या शाळा या लॉकअप रूम झाल्या आहेत. शाळेतील दैनंदिन अध्यापनात सहभागाबाबत बऱयाच ठिकाणी आनंदीआनंद आहे. अनेक शाळांमध्ये तास होत नाहीत. तास होण्याच्या बाबतीत अनेक शाळा-महाविद्यालयांप्रमाणे महाविद्यालये विद्यापीठाप्रमाणे झाली आहेत. अर्थात सर्वच ठिकाणी नव्हे, जिथे अध्ययन अध्यापन प्रक्रिया नीट होत नाही. काही ठिकाणी शाळेच्या निरस भिंतीत अपात्र शिक्षकांबरोबर विद्यार्थी रमणार कसे? मोठय़ा संख्येमुळे वर्गात असलेल्यांचीच तयारी शिक्षक घेऊ शकत नाहीत. नवीन भर म्हणून उपचारात्मक शिक्षणाची तयारी करणं सर्व ठिकाणी शक्य झाले नाही. निरीक्षण, नोंदी कागदावरचे कागदी घोडे ठरले. कागदावर छान, पण कौशल्यात छान नाही असं झालं. उत्तीर्ण केल्यामुळे तणाव निर्मिती कमी झाली, पण तण निर्मिती वाढली आहे.
अभ्यासाची सवय शालेय जीवनातच लागते. श्रवण, पाठांतर, सराव, चिंतन, मनन हे परीक्षेमुळे दृढ होते. काही निकष, सातत्यपूर्ण मूल्यमापन असेल तर तयारी केली जाते. पुनः पुन्हा तयारी करून प्रगती साधत येते. आपण नापास होणारच नाही म्हणून अनेक जण शेफारले, शिक्षक, शाळा बेफिकीर राहिल्या आणि प्रक्रिया नसलेला कच्चा माल अनेकांना त्रासदायक ठरू लागला.
परीक्षेच्या तणावामुळे आत्महत्या वाढतील असा एक मतप्रवाह आहे. पण तणावाची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे सगळय़ांना कशाला वेठीला धरायचे? सधन, उच्चविभूषित, हुशार, असलेला ‘मन्मथ’ आत्महत्येला जवळ का करतो? अनेक तणावात, प्रलोभनात, नेटच्या जाळय़ात विद्यार्थी अडकला आहे. शिस्त आणि चांगल्या सवयींपासून दूर चाललेली पिढी इंटरनेटच्या माध्यमातून मृत्यूला जवळ करत आहे. विरोध, संघर्ष पचवायची ताकदच आजची पिढी हरवून बसलीय. मुलांची कोणतीही मागणी पालक खाली पडू देत नाहीत. मला नाही मिळालं ते माझ्या मुलाला मिळावं यासाठी काही हळवे पालक प्रयत्नशील आहेत. मुलाला शिक्षा नाही. कोणताच संघर्ष नाही, घरात नाही म्हणणारे कोणीच नाही. त्यामुळे व्यक्तिमत्त्व तावूनसुलाखून निघत नाहीत. त्यांच्यासमोर नैराश्य आले की, ते परिस्थितीशी समायोजन करू शकत नाहीत. आपण अप्रगत आहोत व स्वयं अध्ययनाने आपण त्यावर मात करू हे त्याला जाणवले पाहिजे. नापासाचा शिक्का पुसण्याच्या नादात अप्रगत, उपचारात्मक तयारी न झालेले पुढे त्रासदायक ठरणार नाहीत का, हा प्रश्न जिथे काहीच होणार नाही तिथला आहे. ना अटकाव धोरणामुळेही जिथे पालक सजग आहेत, तयारी करून घेतात, शिकवणीलाही पाठवतात तिथे सर्व चांगलंच आहे. नापास न करण्यामुळे शिकवण्या थांबल्या का? स्वयं अध्ययन रुजलं का? ज्यांची क्षमता नाही ते जात, धर्म, राजकारणाच्या जोरावर शैक्षणिक संस्था काढणार. भौतिक सुविधा, तज्ञ शिक्षकवृंद, सुसज्ज ग्रंथालय याचे निकष माहीत नसणारे मुलाखत घेणार. योग्य प्रशिक्षित नसलेले, अप्रशिक्षित विद्यार्थ्यांना शिकवणार. आशयज्ञान नसलेले, संबोध स्पष्ट न करणारे शिक्षक जोपर्यंत आहेत तोपर्यंत प्रश्न राहणारच. परीक्षाबंदी असो, परीक्षा असो कोणी याला विरोध करणार नाही, रिट याचिका दाखल करणार नाही एवढी नैतिकता आज राहिलेली नाही.
आमच्या मुलाला परिपक्व होऊ द्या, मगच वरच्या वर्गात जाऊ द्या असे कोणी म्हणणार नाही. कोचिंग क्लासेसचे दोन्ही प्लॅन ‘ए’ व ‘बी’ तयार आहेत. ज्या निर्णयाची झळ पोहचत नाही त्याच्या वाटेला कोणी जात नाही. पिढय़ा बरबाद झाल्यानंतर आम्ही निष्कर्ष काढतो. ना अटकाव धोरणात तणाव सैल झाले का? मूल्ये रुजली का? सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापनाने संपादन पातळी वाढली का? ज्ञानरचनावादानुसार अध्यापन झाले का? शिक्षक, पालकांचा ताण कमी झाला का? असे अनुत्तरित प्रश्न आजही आहेत.
मुलांच्या जीवनातील संघर्षच आज हरवला आहे. लाल बहादूर शास्त्र्ााr नदी पार करून शिकायला जात, आगरकरांनी दिव्याखाली अभ्यास केला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेच्या उंबरठय़ाच्या बाहेरून शिक्षण घेतले, सावित्रीबाईंनी शेण झेलले. या तुलनेत आजचे विद्यार्थी संघर्षापासून दूरच आहेत. अनावश्यक तणाव सैल करण्याच्या नादात व्यक्तिमत्त्वाचे अस्तित्व हरवू नये. अस्तित्वाला हादरे बसले की व्यक्तिमत्त्वं दुभंगतात. शिक्षण क्षेत्रात अपंगत्व आणणारे निर्णय नकोत. आयुष्याच्या उत्तरार्धात अनेकांची प्रतिभा फुलते ती शालेय जीवनातच. अभ्यासक्रमातून फुलवली तर कृतीयुक्त, विद्यार्थीकेंद्री, स्वयं मूल्यमापन हे शब्द पुस्तकी राहणार नाहीत. मात्र एसएससीसाठी विद्यार्थी तयार करणे हेच शाळेचे प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे बहुतेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीचाच वापर होतो. निकालाची सूज उतरण्यासाठी अंतर्गत गुण बंद होणार का? निकाल कमी लागले की, शाळेच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो. हे थांबायला हवं. परीक्षा असो नसो, ज्ञान, माहिती, कौशल्यापासून मूल्यांपासून आजची पिढी दूर जात आहे. हीच खरी शोकांतिका आहे.
नुकत्याच झालेल्या Central Advisory Board of Education (CABE)च्या मीटिंगमध्ये २५ राज्यांनी सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढे ढकलपास करण्यास विरोध केला. शिक्षण हक्क कायदा आल्यापासून विद्यार्थ्यांची संपादन पातळी घसरली. Annual Status of Education Report (ASER) च्या २०१० च्या रिपोर्टनुसार, ५६.७ टक्के पाचवीचे विद्यार्थी दुसरीच्या वर्गाचे पाठय़पुस्तक वाचू शकले (ग्रामीण भाग). २०१६ पर्यंत ही टक्केवारी ४७.८ टक्क्यांपर्यंत घसरली. प्रामुख्याने ही घसरण सरकारी शाळेत जास्त होती. गणितात तर यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे. २०१० मध्ये पाचवीतील ग्रामीण भागातील केवळ ३६.२ टक्के विद्यार्थी गुणाकार करत होते. २०१६ मध्ये हे प्रमाण २६ टक्क्यांनी घसरले. सरकारी शाळेत तर हे प्रमाण ३३.९ टक्क्यांवरून २१.१ टक्क्यांवर घसरले. म्हणजे पाचवीतील एक पंचमांश विद्यार्थी ग्रामीण व सरकारी शाळेतील गुणाकार करू शकत होते. याचा अर्थ जे शिकायला पाहिजे ते विद्यार्थी शिकत नव्हते व त्यांना वरच्या वर्गात ढकलले जात होते. सहावीत नाव नोंदवलेला मुलगा आठवीत हजेरी, परीक्षा, कोणतेही ज्ञान, कौशल्ये न शिकता या देशाचा सुशिक्षित ठरेल. त्याला आठवी पासचे प्रमाणपत्र मिळेल. शाळेत गेलेल्या मुलांसारखी त्याची संपादन पातळी असेल. याचे उत्तरदायित्व कोणाचे?






























































